मुरूड ः प्रतिनिधी – संपूर्ण देशातील लॉकडाऊनमुळे कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचार्यांना उपाशी राहून ड्युटी करावी लागत आहे. अशा काळात मुरूड शहरातील स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. मंगेश पाटील यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन शुक्रवारी सकाळी मुरूड बाजारपेठेतील पोलिसांना नाश्त्याचे वाटप केले. या वेळी स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. मंगेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष बाबू सुर्वे, कीर्ती शहा व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रहितासाठी संचारबंदीचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून आपल्या भागातील संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा आटोकाट प्रयत्न करीत आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर अधिकचा ताण असतो. तरी पोलिसांनी आपली तब्येत सांभाळून काम करावे, असे डॉ. मंगेश पाटील यांनी या वेळी सांगितले.