कर्जत ः बातमीदार
कर्जत नगर परिषदेने कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी संचारबंदीचा फायदा घेऊन कर्जत शहर निर्जंतुक केले आहे. त्यानंतर नागरिकांची काळजी घेण्यासाठी अधिकची उपाययोजना करण्यासाठी स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. कर्जत नगर परिषदेकडून नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी शहरात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार संचारबंदी लागू झाल्यापासून कर्जतमध्ये फ़ायर ब्रिगेड गाडी व नवीन ऑटो ब्लोअर मशीनद्वारे सोडियम हायपोक्लोराईड मिश्रित द्रावण फवारणी तसेच डास प्रतिबंधक फवारणी करण्यात आली. सर्व भागातील नगरसेवक-नगरसेविकांनी आपापले प्रभाग निर्जंतुक करून घेतले. पालिकेने सर्व अधिकारी-कर्मचार्यांची कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेंर्गत ड्युटी लावली आहे. प्रभागनिहाय स्वच्छता मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व प्रभागांसाठी तारीख निश्चित करण्यात आली असून सदर मोहिमेत एका वेळी 30-35 कामगार सहभागी होत आहेत. बाजारपेठ, महावीर पेठ, म्हाडा कॉलनी, कोतवाल नगर, विठ्ठल नगर, डेक्कन जिमखाना, कचेरी रोड, गुंडगे, रोहिदास नगर, भिसेगाव, क्रांतिनगर, मुद्रे, दहिवली, समर्थनगर, सुयोगनगर, नाना मास्तर नगर, गुरूनगर, इंदिरानगर, संजयनगर, सेवालाल सोसायटी, आकुर्ले, पाटील आळी, ब्राम्हण आळी या भागात स्वछता मोहीम राबविली जात आहे. 11 एप्रिलपर्यंत शहरातील सर्व नागरी भागातील कचरा उचलण्याचे, स्वच्छता राखण्याचे, गटारे वाहती करण्याचे प्रमुख उद्दिष्ट कर्जत नगर परिषदेने ठेवले आहे, अशी माहिती नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी दिली आहे.