Breaking News

सोशल डिस्टन्सिंग झुगारून ‘वडाळे’त मासेमारी

पनवेल : प्रतिनिधी

कोरोनाने संपूर्ण जग हादरून गेले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागरिकांना अत्यावश्यक गरज  असल्याशिवाय घराबाहेर पडू नका आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करीत आहेत. पनवेल तालुक्यात 16 जणांना कोरोनाची लागण झाली असतानाही रविवारी (दि. 5) सकाळी 10.30 वाजता आठ ते दहा तरूण वडाळे तलावात सोशल डिस्टन्सिंग झुगारून मासेमारी करीत असताना दिसत होते. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे देशात रविवार दुपारपर्यंत 3500 पेक्षा जास्त जणांना लागण होऊन 89 जणांचा बळी गेला होता. शासनाने देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. पनवेल महापालिका प्रशासन पनवेलमध्ये कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी काळजी घेत आहे. पोलीसही सतत रस्त्यावर फिरणार्‍यांना घरात बसण्यास सांगत आहेत. पण पनवेलकर मात्र त्याला कोणताही प्रतिसाद देताना दिसत नाहीत. अनेक तरुण पोलिसांना चकवून लॉकडाऊनचे सगळे नियम पायदळी तुडवत असल्याचे दिसत आहेत. रविवारी सकाळी 10.30 वाजता वडाळे तलावातील मध्यभागी असलेल्या पाण्यात उतरून आठ ते दहा  तरूण मासेमारी करीत असताना दिसत होते. याबाबत बल्लाळेश्वर मंदिराजवळ बसलेल्या पोलिसांना माहिती दिल्यावर तेथील दोन पोलीस त्याठिकाणी जाताच ते तरूण पळून गेले. पनवेल तालुक्यात आतापर्यंत 16 कोरोनाबाधित सापडले आहेत. पनवेल शहराच्या वेशीवर कोरोनाचा धोका आलेला असतानाही पनवेलकर मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहेत.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply