Breaking News

आमची युती विचारांची : मुख्यमंत्री

अमरावतीमध्ये महामेळावा; भाजप-शिवसेनेचा झंझावात

अमरावती : प्रतिनिधी

भाजप-शिवसेना युती केवळ सत्तेसाठी नाही; तर ही युती विचारांची आहे. आम्हाला अभिमान आहे आम्ही हिंदुत्ववादी पक्ष आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 15) येथे केले. युतीच्या घोषणेनंतर पहिला संयुक्त महामेळावा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. त्या वेळी ते बोलत होते. भाजप-शिवसेना युती म्हणजे फेव्हिकॉलचा मजबूत जोड असून, ती तोडण्याचा प्रयत्न केला तरी तुटणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.

या महामेळाव्यास प्रामुख्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री सुधीर मुनगंटीवार, डॉ. रणजित पाटील, डॉ. दीपक सावंत, प्रवीण पाटील, संजय राठोड, खासदार सर्वश्री आनंदराव अडसूळ, प्रतापराव जाधव, संजय धोत्रे, भावना गवळी आदी भाजप-शिवसेनेचे नेतेगण, पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते.

भाजप आणि शिवसेना युती ही निवडणुकीपुरती नाही; तर ही अभेद्य युती आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. जिथे भाजपचा उमेदवार असेल तिथे शिवसेनेचा कार्यकर्ता रक्ताचे पाणी करेल आणि जिथे शिवसेनेचा उमेदवार असेल तिथे भाजपचा कार्यकर्ता रक्ताचे पाणी करेल, असे ते म्हणाले. आपले सरकार येण्याच्या आधी इथे गरिबी हटली नव्हती, पण गरिबांची बँकेत खाती तयार झाली. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गरिबांना घर मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे सांगून युती झाल्यानंतर काही जणांनी माघार घेतली, असा टोला मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचे नाव न घेता लगावला.

या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी युतीवर भाष्य केले. वाद असले तरी कधीही आपला संघर्ष राज्याच्या हिताआड येऊ दिला नाही, असे सांगताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. अजूनही मी त्यांना नरेंद्रभाई म्हणतो. आपला भाऊ वाटावा अशी व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी असल्याचा अभिमान आहे, असे ठाकरेंनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी दोन्हींकडून उघड तलवारी काढल्या होत्या. काही गोष्टी झाल्या, त्या सगळ्या विसरा आणि आता खर्‍या तलवारी काढून मैदानात उतरा, असे आवाहन या वेळी ठाकरेंनी केले. शिवसेना-भाजप जनतेची शेवटची अपेक्षा असून, आम्ही गेलो तर अंधार पसरेल, असे सांगत सर्वसामान्यांना आधार देणारे दुसरे कोणीही नाही, असेही ते म्हणाले.

शरद पवारांना भाजपमध्ये घेऊ नका : उद्धव ठाकरे

आजकाल कोणावर टीका करायची म्हणजे भीती वाटते. उद्या तो भाजप नाहीतर शिवसेनेत असायचा, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. या वेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना आता तेवढे शरद पवारांना भाजपमध्ये घेऊ नका, असे गमतीने म्हटले. थोडे तरी लोक समोर ठेवा. सगळेच आपल्या पक्षात आले, तर बोलायचे कोणावर, अशीही टोलेबाजी त्यांनी केली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply