उरण : रामप्रहर वृत्त
सह्याद्री शैक्षणिक, सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वर्तक यांच्या वतीने होळी सणाचे औचित्य साधून रविवारी (दि. 17) 40 वर्षांवरील (फोर्टी प्लस) खेळाडूंची क्रिकेट स्पर्धा उरण तालुक्यातील गोवठणे येथे आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धा उरण पूर्व विभाग मर्यादित असून, प्रथम तीन विजेत्यांना रोख रक्कम व पारितोषिक देण्यात येणार आहे, तसेच उल्लेखनीय कामगिरी करणार्या खेळाडूंना चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेचे आयोजन 2011पासून उरण पूर्व विभागासाठी केले जात आहे. विशेष म्हणजे कोणत्याही संघाकडून प्रवेश फी आकारली जात नाही.
या स्पर्धेच्या माध्यमातून 40 वर्षांवरील खेळाडूंना आपले कसब दाखविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. संपूर्ण उरण पूर्व विभाग या स्पर्धेची दरवर्षी आतुरतेने वाट पाहात असतो.
स्पर्धेची तयारी गोवठणे ग्रामस्थ मंडळ करीत असून, जास्तीत जास्त संघांनी सहभाग घेऊन आनंद लुटावा, असे आवाहन आयोजक असलेले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वर्तक यांनी केले आहे.