Breaking News

पनवेल मनपा क्षेत्रात नवीन निर्बंध

उल्लंघन झाल्यास कडक कारवाई

पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आयुक्त सुधाकर देशमुख यांनी रविवारी (दि. 28) नवीन आदेश जाहीर केले आहेत. 15 एप्रिलपर्यंत हे आदेश लागू असून नागरिकांनी आदेशांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. त्यांचे उल्लंघन केल्यास 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे, तसेच महानगरपालिकेच्या शासकीय कार्यालयांमध्ये लोकप्रतिनिधींव्यतिरिक्त इतरांस अत्यावश्यक कामाशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.
रविवारपासून रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित येण्यास मनाई असेल. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सार्वजनिक उद्याने केवळ सकाळी 7 ते 11.30 या वेळेतच खुली राहतील. सर्व सार्वजनिक ठिकाणे रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहतील. मास्कचा वापर न करणार्‍या तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व चित्रपटगृहे, मॉल्स, नाट्यगृहे, उपाहारगृहे, बार, खानावळ, भोजनालय आणि फूड स्टॉल 28 मार्चपासून रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहतील. या कालावधीत रेस्टॉरंटमधून होम डिलिव्हरी आणि टेक अवे सुविधा सुरू राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास केंद्र शासनाकडून कोविड महामारी संपल्याचे जाहीर होत नाही, तोपर्यंत संबंधित आस्थापना पूर्णत: बंद करण्यात येतील.
महानगरपालिका शासकीय कार्यालयांत लोकप्रतिनिधींव्यतिरिक्त इतरांस अत्यावश्यक कामाशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. ज्यांना कार्यालयामार्फत बैठकीकरिता बोलाविले आहे अशा अभ्यंगतांकरिता संबंधित कार्यालये तसेच कार्यालयप्रमुख यांच्या वतीने विशेष पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती किंवा संस्था यांच्यावर साथरोग अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 ते 60 अन्वये तसेच भारतीय दंडसंहिता कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply