Breaking News

करोनामुळे पुण्यात तिघांचा मृत्यू

पुणे : प्रतिनिधी

येथे 24 तासांत करोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या तिघांच्या मृत्युमुळे पुण्यातील मृतांची संख्या पाचवर पोहोचली आहे.

एका 69 वर्षीय महिलेला पित्ताशयाच्या त्रासामुळे गुलटेकडी येथील अडव्हेंटिस्ट हॉस्पिटलमध्ये 30 मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. त्याच रात्री तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला, परंतु या रुग्णालयात उपचार न करता तिला औंध येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी (दि. 5 मार्च) सकाळी उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

दुसर्‍या घटनेत 60 वर्षांची महिला काही दिवसांपूर्वी नायडू रुग्णालयात उपचारांसाठी आली होती. तिची चाचणी घेतली असता तो अहवाल निगेटिव्ह आल्याने तिला डिस्चार्ज देण्यात आला होता, मात्र प्रकृती बिघडल्याने तिचा शुक्रवारी रात्री घरीच मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह ससून रुग्णालयात दाखल करण्यात आला व तिचा स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यात तिला कोरोनाची लागण झाल्याचे या अहवालात निष्पन्न झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे, तर ससून रुग्णालयातच शनिवारी 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. डायबेटीस आणि हायपरटेन्शनमुळे त्याच्यावर उपचार सुरू होते. रात्री उशिरा त्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

– मराठवाड्यात पहिला बळी

औरंगाबाद : प्रतिनिधी

मुंबई, पुण्यापाठोपाठ  औरंगाबाद शहरात एका 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. त्यामुळे मराठवाड्यात खळबळ उडाली आहे.

सातारा परिसरातील रहिवासी असलेल्या या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी कोरोनासदृश्य लक्षणे दिसून आली होती. त्यानंतर या व्यक्तीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) दाखल करण्यात आले होते. उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सध्या औरंगाबाद शहरात सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply