पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका हद्दीतील शासनमान्य धान्य पुरवठा व्यवस्थितरित्या करण्यात यावा, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पनवेल तहसिलदार यांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, सध्या देशभर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला असून, या विषाणूची लागण नागरिकांना होऊ नये या करिता केंद्र व राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु या लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका हातावर पोट असणार्या कुटुंबांना बसला आहे. कामधंदा, हॉटेल, खानावळ बंद असल्याने खायला अन्न नाही. पनवेलची सध्याची परिस्थिती पाहता व नागरिकांच्या सातत्याने केल्या जाणार्या मागणीच्या अनुषंगाने शासनमान्य धान्य पुरवठा व्यवस्थितरित्या पुरविण्यासाठी पनवेल तहसिलार यांनी आदेश देऊन संबंधित रेशन दुकानदारांना देण्यात यावेत, व अपुरा होत असलेला धान्य पुरवठा वाढीव स्वरुपात तसेच सुरळीत करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन पनवेल तहसिलदार यांना देण्यात आले आहे.