तळोजा वसाहतीत सीसीटीव्ही कॅमेर्याच्या कामाला विलंब
नवी मुंबई ः प्रतिनिधी
तळोजा वसाहतीच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी सिडको आणि पोलीस प्रशासन गेल्या दोन वर्षापासून प्रयत्न करीत आहेत, मात्र रेल्वे प्रशासनाकडून केबल टाकण्यासाठी परवानगी मिळत नसल्यामुळे विलंब होत असल्याचे सिडकोच्या सूत्रांनी सांगितले.
सिडकोने खारघर वसाहतीत सीसीटीव्ही कॅमरा बसविल्यानंतर तळोजा वसाहतीला लागूनच असलेले सिडकोच्या मेट्रो रेल्वेचे कारशेड तळोजा पाचनंद आणि पेंधर मेट्रो रेल्वेस्थानकात सीसीटीव्हीची आवश्यकता आहे. गेल्या तीन वर्षात तळोजा वसाहतीमधील वाढती लोकसंख्या त्याचबरोबर साखळीचोरी, घरफोड्या आणि महिलेची छेडछाड आणि वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसावा, यासाठी सेक्टर आणि महत्त्वाच्या ठिकाणाचे सर्वेक्षण करून सिडकोने नवी मुंबई पोलिसांच्या मदतीने तळोजा वसाहतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी प्रयत्न करीत आहे, मात्र सीसीटीव्हीसाठी लागणार्या केबल वाहिन्या टाकण्यासाठी तळोजा आणि खारघर वसाहतीच्या सीमा रेषेवर असलेल्या मुंबई-मडगाव, मुंबई- पुणे रेल्वे, एमएसआरडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागाकडून केबल वाहिन्या टाकण्यासाठी कराव्या लागणार्या खोदकामाची परवानगी मिळविण्यासाठी सिडको आणि पोलीस प्रशासन गेल्या दोन वर्षापासून प्रयत्न करीत आहे.त्यात सार्वजनिक बांधकामाकडून परवानगी मिळाली आहे, मात्र रेल्वे आणि एमएसआरडीसीकडून चालढकल होत आहे.
– तळोजा वसाहतीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी लागणार्या परवानगी मिळविण्याचे काम सुरू आहे. सार्वजनिक बांधकामाकडून परवानगी मिळाली आहे. रेल्वे प्रशासनातील अभियांत्रिकीचे काम पाहणार्या अधिकार्याबरोबर बैठक झाली आहे.