मुरूड ः प्रतिनिधी
मुरूडमधील असंख्य नागरिक नोकरीसाठी मुंबई व पनवेल येथे कार्यरत आहेत. मुंबईपासून मुरूडचे अंतर 160 किलोमीटर आहे, परंतु लॉकडाऊन जाहीर होण्याआधी काही विशेष कामासाठी गेलेले नागरिक व नोकरीसाठी असलेल्या नागरिकांची कोंडी झाली आहे. फक्त घरात बसून या सर्वांनी काही दिवस घालवले, परंतु नंतर अस्वस्थ होऊन तालुक्यातील अनेकांनी पायी चालत मुरूड गाठले आहे.
हाताचे काम थांबल्यामुळे काम करणार्या लोकांमध्ये अतिशय अस्वस्था पसरली आहे. कोणतेही काम नसल्याने आपल्या मूळ गावी जाण्याचे त्यांनी ठरवले. मनाचा दृढ निश्चय झाल्यावर भल्या पहाटे उठून चालण्यास सुरुवात करून अखेर त्यांनी मूळ गाव गाठले. गणपती उत्सवात येणारे हे सर्व जण यंदा लवकर आल्याने गावात बाहेरून आलेल्या लोकांची संख्या वाढली आहे. 160 किलोमीटरचे अंतर चालून ते मूळ गावी पोहचले आहेत. मुंबई येथून आलेल्या लोकांची मुरूड येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसुद्धा करण्यात आली आहे, तर काही लोक स्वतःहून तपासणी करून घेत आहेत. त्याचप्रमाणे लोक जागरूक झाले असून नवीन आलेल्या लोकांची माहिती पोलिसांना देत असल्याने सर्वांची आरोग्य तपासणी होत आहे. मुरूड तालुक्यात अद्याप एकही कोरोनासदृश रुग्ण आढळला नाही, तरीसुद्धा ग्रामस्थ योग्य ती काळजी घेत असून पोलीस प्रशासनास उत्तम सहकार्य करीत आहेत.