Breaking News

नवी मुंबईतील 850 पोलीस कोरोनामुक्त

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोरोनावर मात करण्यात नवी मुंबई पोलिसांनी यश मिळविले आहे. त्याकरिता पोलिसांच्या वेलनेस टिमचे नियोजन महत्वाचे ठरत आहे. या दरम्यान अनेक पोलिसांच्या कुटुंबांना जीवदान देण्याचे काम या टीमच्या नियोजनातून शक्य झाले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या नियोजनाचे इतरत्र कौतुक होत आहे.

राज्यात कोरोनाचा हाहाकार माजलेला आहे. अशा परिस्थितीत कोरोना नियंत्रणात बंदोबस्ताची मुख्य जवाबदारी पोलिसांवर आहे. त्यानुसार, राज्यातले पोलीस दिवसरात्र बंदोबस्त करत असताना स्वत:ही कोरोनाबाधित होत आहेत. यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे, नवी मुंबई पोलीस दलात सुमारे 4,500 अधिकारी व कर्मचारी आहेत. नवी मुंबई पोलिसांच्या नियोजनबद्ध आखणीमुळे सुमारे 850 पोलीस व त्यांचे सुमारे 500 नातेवाइक कोरोनामधून सुखरूप बाहेर येऊ शकले आहेत.

नवी मुंबई पोलिसांकडून बंदोबस्त सुरू असताना, त्यांना कोरोनाची लागण झाल्यास तातडीने उपचार मिळावेत, यासाठी वेलनेस टीम तयार करण्यात आलेली आहे. मुख्यालय उपायुक्त शिवराज पाटील, विशेष शाखा उपायुक्त सुरेश मेंगडे व सहायक आयुक्त विनोद चव्हाण यांच्या नियोजनाखाली ही टीम कार्यरत आहे. त्यामध्ये आठ ते दहा निरीक्षकांच्या समावेश आहे. एकाद्या अधिकारी अथवा कर्मचार्‍याला कोरोना होऊन प्रकृती खालावल्यास उपचारासाठी डॉ. डी. वाय. पाटील, तसेच इतर रुग्णालयात सोय करण्यात आली आहे, तर क्वारंटाइन व किरकोळ उपचारासाठी नेरुळ व कळंबोली येथे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. सध्या तेथे सुमारे 150 पोलिसांवर उपचार सुरू आहेत.

रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यास कोरोना होऊन जिवाला धोका उद्भवू शकतो. यामुळे मार्च महिन्यातच नवी मुंबई पोलीस दलातील 55 वर्षांवरील अधिकारी व कर्मचार्‍यांना बंदोबस्तातून वगळण्यात आले. त्याशिवाय जे अधिकारी व कर्मचारी बंदोबस्त करत आहेत, त्यांना रोगप्रतिकार शक्ती वाढविणारी औषधे, तसेच काढा पुरविण्यात आला. यामुळे सतत बंदोबस्तावर राहून अनेक जण कोरोनापासून सुरक्षित राहिले आहेत.

दरम्यान, कोणाला आवश्यक औषधांची कमी भासणार नाही, याचीही खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आली आहे. शिवाय कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या प्रत्येकाची वरिष्ठांकडून चौकशी केली जात असल्याने, त्यांनाही दिलासा मिळत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply