अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्हा पोलीस दलाकडून अलिबाग शहरातील पीएनपी परिसरात जंतुनाशक फवारणी यंत्रणा कार्यान्वित कऱण्यात आली आहे. बाजारात येणार्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी ही यंत्रणा कार्यरत असणार आहे. अलिबाग येथील भाजी मार्केट आणि मच्छीमार्केट परिसरात ग्राहकांची नियमित वर्दळ असते, मात्र अशाच गर्दीच्या ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची जास्त शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन जंतुनाशक फवारणी यंत्रणा रायगड पोलिसांमार्फत बसविण्यात आली आहे. यामध्ये सोडियम हायपोक्लोराईड या जंतुनाशकाचा वापर केला जाणार आहे. बाजारात येणार्या-जाणार्या ग्राहकांवर या जंतुनाशकाची फवारणी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या उपस्थितीत ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम, अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे उपस्थित होते. वैद्यकीय अधिकार्यांच्या सल्ल्यानुसार ही फवारणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.