पेण : रामप्रहर वृत्त
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आल्याने अनेकांचे हाल होत आहेत. विशेषकरून कामगारवर्गाची परवड होत आहे. जेएसडब्ल्यू कंपनीत काम करणार्या मूळच्या राजस्थानमधील कामगारांची अशाच प्रकारे उपासमार होऊ नये यासाठी वडखळ ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश मोकल यांनी त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
राजस्थानमधील खासदार मनोज भगोरिया यांनी रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात डोलवी येथे असलेल्या जेएसडब्ल्यू कंपनीतील कामगारांना मदतीचा हात द्यावा, असे उत्तर भारतीय सेलचे अवधेश शुक्ला यांना सूचित केले होते. त्यानुसार याकडे स्थानिक पदाधिकार्यांचे लक्ष वेधले असता वडखळचे सरपंच राजेश मोकल यांनी या कामगारांना 50 किलो तांदूळ, प्रत्येकी 10 किलो डाळ व साखर, पाच किलो मसाला, चहा पावडर, हळद, तेल अशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. मदत देतेवेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, वडखळचे उपसरपंच जगदिश म्हात्रे, रवी मोकल, सुजित पाटील, वामन पाटील, जनार्दन पाटील उपस्थित होते.