रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग एसटी आगाराच्या नुतनीकरणाचे काम गेले दोन वर्षे रखडले आहे. तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2019 रोजी अलिबाग एसटी बस आगाराच्या नुतनीकरणाच्या कामाचा नारळ फोडला गेला होता. हे काम फेब्रुवारी 2021 पर्यंत पुर्ण होणे अपेक्षित होते. मात्र मुदत संपली तरी बस स्थानकाच्या कामाला सुरूवात होऊ शकलेली नाही. अलिबाग हे रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक उत्पन्न देणारे एसटी आगार आहे. अशा सर्वाधिक उत्पन्न देणार्या आगाराच्या नुतनीकरणाच्या कामाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. अलिबाग स्थानक हे तब्बल 59 वर्षे जुने आहे. त्याची अनेकदा दुरूस्ती करण्यात आली. दरवर्षी पावसाळ्यात या आगारामध्ये चिखल व्हायचा. त्यामुळे या आगाराचे काँक्रीटीकरण करण्यात आले. त्यानंतर युती सरकारच्या काळात या आगाराचे नुतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे येथील डिरोक्ट्रीक इंजिनिअरींग कंपनीकडून या बसस्थानकाचा आराखडा तयार करण्यात आला. तळ मजला आणि पहिला मजला असे बांधकाम केले जाणार होते. यात 14 फलाटांचे बस स्थानक, प्रतीक्षालय, उपहारगृह, आरक्षण कक्ष, हिरकणी कक्ष, बस स्थानक कार्यालय, वाहक आणि चालकांसाठी विश्रामगृह, पार्सल खोली यासारख्या सुविधांचा समावेश आहे. एक लाख प्रवाशांची ये – जा करता येईल, अशा पध्दतीने या बस आगाराची उभारणी केली जाणार आहे. सात हजार 530 चौरस फूटाचे बांधकाम या अंतर्गत करण्यात येणार आहे. त्यासाठी सहा कोटी 28 लाख रुपये खर्च अपेक्षीत आहे. एसटीचे पनवेल आगार जरी रायगड जिल्ह्यात येत असले, तरी तेथे येणार्या लांबपल्ल्याच्या गाड्या इतर आगारातून येणार्या आहेत. पनवेल आगारातून लांबपल्ल्याच्या गाड्या सूटत नाहीत. त्यामुळे हे उत्पन्न परजिल्ह्यातील आगारांना मिळते. पनवेलमधून सुटणार्या गाड्या या लोकल आहेत. त्याचे उत्पन्न कमी आहे. अलिबागमध्ाून लांबपल्ल्याच्या गाड्या सुटतात. त्याचे उत्पन्न अलिबाग आगारालाच मिळते. त्याचबरोबर लोकल गाड्यादेखील सुटतात. अगदी कोविड महामारीच्या काळातही अलिबाग आगराचे उत्पन्न सर्वाधिक आहे. ज्या गाड्या सध्या सोडल्या जात आहेत, त्याचे भारमान 70 टक्के आहे. अशा या सर्वाधिक उत्पन्न देणार्या अलिबाग एसटी आगाराची दुरावस्था आहे. आगारात प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा नाहीत. पिण्याचे शुध्द पाणी नाही, चांगले स्वच्छतागृह नाही, प्रतीक्षागृह नाही. केवळ काँक्रीटीकरण झाले आहे एवढेच समाधान आहे. जी अवस्था प्रवाशांच्या सुविधांबात आहे, तीच अवस्था कर्मचार्यांच्या सुविधांबाबत आहे. कर्मचार्यांना पिण्याचे शुध्द पाणी नाही. कर्मचार्यांसाठी जे विश्रामगृह आहे, त्यात सुविधा नाहीत. पाण्याची व्यवस्था नाही, विश्रामगृहाच्या खिडक्या तुटलेल्या आहेत. अशा परिस्थितीत परजिल्ह्यातून येणार्या कर्मचार्यांना रहावे लागत आहे. अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय आहे. त्याचप्रमाणे अलिबाग पर्यटनस्थळदेखील आहे. अलिबागची ओळख मिनी गोवा अशी आहे. त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात अलिबागमध्ये येतात. जिल्ह्याचे मुख्यालय असल्यामुळे आपल्या शासकीय कामासाठी जिल्ह्याच्या विविधभागातून दररोज हजारो लोक अलिबागला येतात. पर्यटन व कामासाठी येणारे बहुतांश लोक हे एसटी बसनेच प्रवास करतात. जिल्ह्याचे मुख्यालय व पर्यटनस्थळ असल्यामुळे अलिबाग एसटी आगारदेखील चांगले असेल, तेथे चांगल्या सुविधा असतील, असा समज परजिल्ह्यातून येणार्या प्रवाशांचा झालेला असतो. परंतु प्रथमदर्शनीच त्यांचा भ्रमनिरास होतो. अलिबागमध्ये अत्याधुनिक सुविधा असलेले एसटी आगार असावे, अशी अनेक वर्षापासूनची मागणी आहे. काही वर्षांपुर्वी या आगारात पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य असायचे. काँक्रीटीकरण केल्यामुळे ती समस्या दूर झाली आहे. परंतु इतर सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे या आगाराचे नुतनीकरण करण्याचा निर्णय युती सराकरच्या काळात घेण्यात आला. या कामाचे भूमीपूजनदेखील झाले. भूमीपूजन करून दोन वर्षे झाली. परंतु प्रत्यक्ष कामाला मात्र सुरूवात झालेली नाही. महाराष्ट्रातील काही एसटी आगारे उत्तमप्रकारे बांधण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे अलिबागचे एसटी आगारदेखील सर्व सुविधांनी युक्त असणार आहे. तसा आराखडा तयार तर आहेच, परंतु काम सुरू होत नाही. अलिबागा एसटी आगाराच्या नुतनीकरणाच्या कामासाठी शासनाने निविदा मागविल्या होत्या, त्या सप्टेंबर 2019 मध्ये उघडण्यात आल्या. नंतर या निविदा मंजुरीसाठी मंत्रालयात पाठविण्यात आल्या. तेव्हापासून आजतागायत त्या निविदा मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. त्यामुळे हे काम रखडले आहे. अलिबाग एसटी आगाराचे नुतनीकरणाचे काम लवकर सुरू व्हावे, यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायला हवा.
-प्रकाश सोनवडेकर