कोळी बांधवांची मागणी; शेकडो बोटी किनार्याला
मुरूड ः प्रतिनिधी – अवकाळी पाऊस आणि त्यानंतर आलेले कोरोनाचे संकट यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्याचा कोळी समाज मेटाकुटीस आला आहे. ऐन मासेमारी हंगाम सुरू असतानाच कोरोनामुळे सर्व होड्या किनार्याला लागल्या आहेत. मुंबईतील प्रमुख बाजार आणि मासळी मार्केटही बंद असल्यामुळे सर्व कोळी बांधव घरी बसून आहेत. कमाईच नाही तर घर कसे चालवायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी शासनाने अशा कठीण परिस्थितीत शेतकर्यांप्रमाणे कोळी बांधवांनाही आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी हनुमान मच्छीमार सोसायटीचे चेअरमन पांडुरंग आगरकर यांनी केली आहे. या वेळी त्यांच्या समवेत मोतीराम पाटीलही उपस्थित होते.
या वेळी त्यांनी सांगितले की, शासनाकडून फक्त रेशनिंगचे गहू, तांदूळ दिले जात आहेत, परंतु इतर गोष्टीला पैसे तर लागतात. आमच्या लोकांनी या परिस्थितीत जीवन कसे जगावे. मच्छीमारी बंद असल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. काही समाज बांधवांनी कर्ज काढून होड्या बनवल्या, परंतु अवकाळी पावसानंतर कोरोनाचे संकट आल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आज शेकडो बोटी किनार्याला लागल्या असून कमवता व्यक्ती घरी बसून आहे. कोळी समाजाची व्यथा शासनाने समजून घ्यावी व शेतकर्यांप्रमाणे आम्हालाही आर्थिक सहकार्य करण्याची विनंती समाजाच्या वतीने चेअरमन पांडुरंग आगरकर यांनी शासनाकडे केली आहे. मे महिन्याच्या 20 तारखेपर्यंत मच्छीमारी करण्याची परवानगी असते, परंतु पावसाळी वातावरण सुरू होताच जोरदार वारे वाहू लागतात व मच्छीमारांना मासळी पकडण्यासाठी प्रतिबंध केला जातो. त्यामुळे मच्छीमारीसाठी थोडेच दिवस शिल्लक असल्याने मच्छीमारीसाठी परवानगी द्यावी, अशीही कोळी समाजाची मागणी आहे.