उपयुक्त साहित्य जिल्हाधिकार्यांकडे सुपूर्द
अलिबाग ः जिमाका – स्वदेस फाऊंडेशनच्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्हा प्रशासन व जिल्हा रुग्णालयाला एक लाख ट्रिपल लेयर मास्क, पाच हजार एन 95 मास्क, दोन हजार 500 पी. पी. ई. किट, दोन थर्मल स्कॅनरचे हस्तांतरण स्वदेश फाऊंडेशनचे महाव्यवस्थापक तुषार इनामदार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.
तसेच माणगाव, तळा, सुधागड, पोलादपूर, श्रीवर्धन, महाड, म्हसळा तालुक्यातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स व कर्मचारी, पोलीस स्टेशनमधील अधिकारी-कर्मचार्यांना 10 हजार ट्रिपल लेयर मास्कचे वाटप करण्यात आले. अतिगरजू 114 आदिवासी वाड्यांत स्वदेस फाऊंडेशनतर्फे एका महिन्याचे रेशनचे साहित्य व किराणा देण्यात येत आहे. मुंबईतील दवाखान्यांत आतापर्यंत 16 हजार 990 जेवणाचे पॅकेट्स डॉक्टर्स व नर्सेस यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती स्वदेस फाऊंडेशनचे महाव्यवस्थापक तुषार इनामदार यांनी या वेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना दिली.
या कामाचे कौतुक करून स्वदेस फाऊंडेशनचे प्रमुख रॉनी स्क्रूवाला व झरीना स्क्रूवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे व संपूर्ण स्वदेस टीमचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी विशेष आभार मानले. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, तहसीलदार (महसूल) विशाल दौंडकर व स्वदेस फाऊंडेशनचे वरिष्ठ समन्वयक नयन पोटले उपस्थित होते.