नवी मुंबई ः बातमीदार
सिडकोच्या विविध गृहसंकुलांतील उपलब्ध 4,158 घरांसोबतच 245 वाणिज्यिक गाळे आणि रेल्वे स्थानक संकुलांतील सहा कार्यालये (कमर्शियल प्रीमाईसेस) विक्रीच्या योजना सिडको महामंडळातर्फे सादर करण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह छोटे व्यापारी व व्यावसायिकांना या योजनांच्या माध्यमातून सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. महागृहनिर्माण योजनेंतर्गत नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोडमधील सिडकोच्या गृहसंकुलांतील 4,158 घरे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परवडणार्या दरातील या 4,158 घरांपैकी 404 घरे ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता आणि उर्वरित 3,754 घरे ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नवीन उत्पन्न मर्यादा 6,00,000 रू. तर अनुदानाची रक्कम 2,50,000 रू. निश्चित करण्यात आली आहे. नवी मुंबईतील विकसित नोडमध्ये आणि मोक्याच्या ठिकाणी घरे असलेली गृहसंकुले वसलेली आहेत. या गृहसंकुलांना रस्ते, रेल्वे आणि सिडकोच्या मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभलेली आहे. आधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असणार्या या गृहसंकुलांच्या परिसरात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये इ. सर्व सामाजिक सुविधाही उपलब्ध आहेत. यासोबतच सिडकोच्या खारघर, तळोजा, द्रोणागिरी, कळंबोली, खारघर आणि घणसोली गृहसंकुलातील एकूण 245 वाणिज्यिक गाळे विक्रीकरिता उपलब्ध आहेत. तसेच नेरूळ रेल्वे स्थानक संकुल आणि जुईनगर स्थानक संकुल येथील प्रत्येकी 3 याप्रमाणे एकूण 6 कार्यालये (कमर्शिअल प्रीमाईसेस) विक्रीकरिता उपलब्ध आहेत. या योजनांद्वारे समाजातील सर्व घटकांना सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे, ज्यामुळे शहराच्या आर्थिक विकासात मदत होण्यासोबतच नवी मुंबईच्या वाणिज्यिक क्षमता वृद्धिंगत होऊन शहराच्या आर्थिक विकासासही हातभार लागणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह छोटे व्यापारी व व्यावसायिकांना विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. नागरीक, व्यापारी व व्यावसायिकांनी लवकरात लवकर या योजनांचा लाभ घ्यावा व आपले घराचे आणि व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करावे असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत आहे.