Breaking News

लॉकडाऊनचा मार्गच योग्य

भारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या विकसनशील देशासाठी हा निर्णय सोपा नव्हता. आर्थिक दृष्टीने पाहिले तर आपण खूप मोठी किंमत मोजली आहे, परंतु देशातील प्रत्येक नागरिकाचा जीव आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, हे मोदींनी स्पष्ट केले. गेले काही दिवस ते सातत्याने देशभरातील मुख्यमंत्र्यांशी बोलत आहेत. परिस्थितीचा अचूक अंदाज घेऊनच आपण निवडलेला लॉकडाऊनचा मार्ग योग्यच होता, असे प्रतिपादन मोदींनी ठामपणे केले.

लॉकडाऊन संबंधात पंतप्रधान नरेंद्र मोदी काय निर्णय घेतात याकडे अवघ्या देशाचे डोळे लागले होते. अखेर 14 तारीख उजाडली आणि मोदींनी लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. निश्चितपणे सरकारसाठीदेखील हा निर्णय सोपा नाही, परंतु देशभरातील जनतेच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत खंबीरपणे मोदींनी पुन्हा एकदा हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाप्रत आपण कसे पोहचलो याचे अतिशय सुस्पष्ट विवेचन मोदींनी आपल्या संदेशात केले. जगभरात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. खरंतर ही वेळ तुलना करण्याची नाही, परंतु महिनाभरापूर्वी ज्या देशांची स्थिती भारतासारखीच होती, त्यांच्याकडील कोरोनासंबंधीची आकडेवारी आज भयावह आहे, याकडे मोदींनी

निर्देश केला. भारताने मात्र वेगाने आणि खंबीरपणे निर्णय घेतले. अवघे 550 कोरोनाबाधित असताना भारताने देशव्यापी लॉकडाऊन घोषित केला. लॉकडाऊन केले नसते तर आपल्याकडेही भयावह परिस्थिती ओढवू शकली असती. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आज आपले कौतुक होत आहे, हे मोदींनी सांगितलेच. याखेरीज राज्यांनी व स्थानिक स्वराज्य संस्थांनी परिस्थिती खूप उत्तमरीतीने सांभाळली, अशी कौतुकाची थापही त्यांनी दिली. लॉकडाऊनमुळे रोजगार बुडालेली तळागाळातली जनता हवालदिल आहे. कित्येकांना सरकारी यंत्रणा वा स्वयंसेवी संस्थांकडून दिल्या जाणार्‍या अन्नाचाच आधार आहे. अडकून पडलेले असंघटित मजूर गावी जाण्याच्या तयारीत आहेत. या सार्‍याचा दबावही सरकारवर आहेच, परंतु लोकानुनय करण्यापेक्षा वास्तवाचे भान ठेवून मोदींनी जिथे आहोत, तिथेच राहू, असेच सांगितले. संयम व शिस्तीने लॉकडाऊनचे पालन करणार्‍या जनतेचे त्यांनी कौतुक केले. ज्या भागांमध्ये कोरोनाच्या केसेस नाहीत, तेथे 20 तारखेनंतर सशर्त सवलत देता येईल, असेही मोदींनी सांगितले. अर्थात कोरोनाचा फैलाव आढळल्यास या सवलती लागलीच मागेही घेतल्या जातील. लॉकडाऊनचे पालन कशा रीतीने होत आहे याचे प्रत्येक राज्य तसेच जिल्हा पातळीवर सातत्याने मूल्यांकन केले जाईल, हेही त्यांनी स्पष्ट केले आहे. इथून पुढील वाटचालीसाठी केंद्राकडून विस्तृत मार्गदर्शक तत्त्वे बुधवारी जारी केली जाणार आहेत. गरिबांच्या जगण्यातील अडचणी कमी करणे, शेतकर्‍यांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेणे आदींना सरकार प्राधान्य देणार आहे, असे सांगतानाच कोरोनावर प्रभावी लस शोधण्याकरिता देशातील तरुण संशोधकांनी पुढे यावे, असे अत्यंत प्रेरणादायी आवाहन करायलाही मोदी विसरले नाहीत. वृद्धांची, आपल्या अवतीभवतीच्या गरीब कुटुंबांची काळजी घ्या, घरगुती मास्क वापरा, आयुष विभागाने सुचवलेले उपाय करा, असे आपुलकीचे आवाहन करतानाच कुणीही कर्मचार्‍यांना कामावरून काढू नये, असेही मोदींनी बजावले. मोदींनी सुचवलेली सप्तपदी हाच कोरोनावर विजय मिळवण्याचा मार्ग आहे. तेव्हा मोदींच्या आवाहनानुसार आपण सारे संपूर्ण निष्ठेने 3 मेपर्यंत लॉकडाऊनचे पालन करूयात आणि कोरोनाच्या संकटाला परतवून लावूयात.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply