उन्हाळ्यात आग होत असल्यास थंड पाणी सेवन केल्यास अत्यंत फायदा होतो. उन्हाळा वाढल्यानंतर विविध प्रकारचे उष्णतेचे विकार वाढायला सुरुवात होते. खरंतर खूप व्यक्तींना मुळातच काही पित्ताचे विकार किंवा तत्सम उष्णतेने वाढणार्या व्याधी किंवा लक्षणे असतात आणि ती वातावरणातील उष्म्याने वाढू लागतात, परंतु उन्हामुळे व्यक्तींना तहान लागणे, शरीरात आग होणे, पोटात आग होणे, घाम येणे, चक्कर येणे, थकवा येणे, पोटर्या दुखणे अशी विविध लक्षणे दिसू लागतात. उन्हाळा हे एक कारण असले तरी या सर्व लक्षणांना निर्माण करणारी शरीराची त्रिदोषांची विकृत अवस्था वेगळी असल्याने एकच पथ्य नसून शास्त्रकारांनी त्यांना विभक्तपणे वर्णन करून आरोग्य संस्थापन करण्यासाठी निश्चित आणि नेमकी कल्पना मांडली आहे. उन्हाळ्यात शरीर व मनाच्या आरोग्याच्या तक्रारी अगदी तापापासून ते थेट नागीण, कांजण्यांपर्यंत दिसू लागतात. खरंतर योग्य आहार नियोजन आणि विहार नियोजन त्यामध्ये वस्त्र, त्यांचे रंग, सायंकाळची वस्त्र, बिछान्यावरील वस्त्र अशा अनेक गोष्टींचा विचार युक्तीपूर्वक केल्यास उन्हाळा साजरा करता येईल. एकतर खाण्याची चंगळ उन्हाळ्यात असते. ताडगोळे, तोंडाला पाणी आणणार्या कैरीपासून ते आंब्यापर्यंत, ओले काजू, कुयरी, करवंद, त्यांचे विविध पदार्थ शरीराला अगदी तृप्त करतात. त्यांचा उपभोग घेता आला पाहिजे. यासाठी उन्हाळ्यातील पथ्य आणि अपथ्य यांचे उत्तम नियोजन करायला हवे. उन्हाळ्यात पाणी हाच पदार्थ मुळात योजायला हवा. केरळमध्ये विविध वनस्पतींयुक्त गरम पाणी सेवन करण्याची प्रथा आहे. हे पाणी सगळ्यांना दिले जाते. अनेक जण हे पाणी बाटलीतून घेऊन फिरतात आणि तिथे उन्हाळ्याचे विकार अत्यल्प होताना दिसतात. कारण त्यांनी पाण्यावर शरीराचे नियोजन केले आहे. या पाण्यात नागरमोथा, जेष्ठमध, थोडसे चंदन, खैरसाल, सुंठ यांचे मिश्रण असते. याबरोबर साथ असते ती ताकाची. त्याला ‘मोर’ असे म्हणतात. हे पाणी तहान भागवते. सतत पाणी सेवन करण्याची ओढ कमी करते. शरीर थंड तर ठेवतेच, पण भूकही वाढवते. त्वचा थंड ठेवण्याचे विशेष काम हे करते. सौंदर्य वाढवते. लघवीचा त्रास कमी करून पोटाचाही त्रास कमी करते. पाण्याच्या सेवनाला खूप महत्त्व आहे. उन्हाळ्यात आग होत असल्यास थंड पाणी, वाळा, चंदन घातलेले पाणी किंवा कापराने सिद्ध केलेले पाणी सेवन केल्यास अत्यंत फायदा होतो, तर सारखी तहान लागत असल्यास तांब्याच्या वा चांदीच्या पात्रातील पाणी तसेच नारळाच्या पाण्याने बरे वाटते. या अवस्थेत धने, जिरे टाकून सिद्ध केलेले पाणीही उत्तम गुणकारक ठरते. लघवीला जळजळ होत असल्यासही धने, जिरे, बडीशेप टाकून पाणी सिद्ध करावे आणि तेच प्यावे. मातीच्या भांड्यातील पाण्यामध्ये नैसर्गिक गुणांची वृद्धी होते.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …