मुरूड ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाल्यापासून मुंबईसह अन्य शहरात राहणार्या लोकांनी आपले मूळ गाव गाठण्याचा प्रयत्न केला. संथगतीने हे लोक आपल्या गावी पोहचले आहेत. आतापर्यंत सरकारी दस्तावेजाप्रमाणे मुरूड तालुक्यातील विविध गावे व शहर मिळून 5900 लोक आपल्या गावी दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. सदर लोकांची माहिती गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, आशा वर्कर प्रत्येक गावावर लक्ष ठेवत आहेत. वाढत्या स्थलांतरामुळे रुग्णसंख्या वाढेल या भीतीने शासकीय विश्रामगृह येथे 20 बेड, ग्रामीण रुग्णालयात अतिरिक्त बेड, त्याचप्रमाणे जुन्या नगर परिषदेतही अतिरिक्त बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. बाहेरील नागरिकांना किमान 12 ते 14 दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येते. कोणतीही लक्षणे दिसून न आल्यास त्यांना होम क्वारंटाइन केले जात आहे. मुंबई, पुणे आदी ठिकाणाहून येणार्या नागरिकांची तपासणी करून त्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारून त्यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केला जात आहे. मुरूडमध्ये विदेशातून आलेल्यांपैकी 51 जणांना हॉस्पिटल क्वारंटाइन व आयसोलेशन कक्षासह होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला. 1149 नागरिकांची गाव पातळीवर तपासणी करण्यात आली. 5900 नागरिक लॉकडाऊनच्या आधीपासून येण्यास सुरुवात झाली आहे. लोकांचा गावाकडे येण्याचा ओघ वाढला असून सदरच्या नोंदी ठेवण्यात येत आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांच्यावर उपचार होत आहेत, अशी माहिती मुरूड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय चव्हाण यांनी दिली आहे.