Breaking News

नागोठण्यात दुचाकीस्वारांना दणका

शेकडो वाहनचालकांवर कारवाई; पोलिसांची धडक मोहीम

नागोठणे ः प्रतिनिधी

संचारबंदी सुरू असतानाही दुचाकीवर नाहक हिंडणार्‍या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याची धडक मोहीम नागोठणे पोलीस ठाण्यामार्फत राबविण्यात आली आहे. रविवार वगळता शुक्रवारपासून ही मोहीम हाती घेतली असून बुधवारपर्यंत साधारणतः 300 दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी स्पष्ट केले. या धडक कारवाईमुळे विनाकारण रस्त्यांवर फिरणार्‍या दुचाकीस्वारांना चांगलाच दणका बसला आहे. संचारबंदी असल्याने दुचाकी किंवा चारचाकीचा विनाकारण वापर टाळावा, अशी नागोठणे पोलीस त्यांच्या ध्वनिक्षेपकाद्वारे दररोज विनंती करीत असतानाही अगदी माचिस, कोथिंबिरीपासून भाजीपाला किंवा किराणा सामान आणण्यासाठी नागोठण्यातील दुचाकीस्वार आपल्या वाहनांद्वारे येथील शिवाजी चौकात येत असल्याने माणसांबरोबर वाहनांची गर्दी होत असते. या वाहनांवर निर्बंध आणण्यासाठी पोलीस निरीक्षक  घुटुकडे यांच्या उपस्थितीत इतर पोलीस कर्मचार्‍यांनी विनाकारण फिरणार्‍या वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी दररोज सकाळपासून दुपारपर्यंत कारवाईचा बडगा उगारला आहे. तीन ते चार तासांच्या कारवाईत अनेक मासे पोलिसांच्या गळाला लागत असून बुधवारी 50 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई, तर आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या, असे घुटुकडे यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून पारित करण्यात आलेल्या अधिकृत पास असलेल्या वाहनांव्यतिरिक्त इतर सर्व वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुवारपासून ही मोहीम आणखी तीव्र करून अशी वाहने संचारबंदी लागू असेपर्यंत जप्त करण्यात येणार असून गांधी चौक तसेच इतर महत्त्वाच्या भागातही ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply