पनवेलमध्ये बीएच सिरीजच्या नोंदणीला सुरुवात
पनवेल : वार्ताहर
नवीन वाहने खरेदी करणार्या ग्राहकांना बीएच नोंदणीचा पर्याय मिळणार आहे. ज्या लोकांच्या नोकरीनिमित्त राज्ये बदलावी लागतात, त्यांना बीएच नोंदणीचा चांगला पर्याय असणार आहे. पनवेल प्रादेशिक परिवहन विभागात बीएच सिरीजच्या नोंदणीला सुरुवात झालेली आहे. जर बीएच नोंदणीमध्ये वाहनाची नोंदणी केली, तर दुसर्या राज्यात जाताना वाहनमालकांना नव्याने नोंदणी करावी लागणार नाही. यापूर्वी एका राज्यातून दुसर्या राज्यात राहण्यासाठी गेलेल्या वाहनमालकांना वाहनांची नव्याने नोंदणी करावी लागत होती. बीएच सिरीज असणारे वाहन घेऊन दुसर्या राज्यात गेलो, तर 30 दिवसांच्या आत फॉर्म नंबर 33 ऑनलाईन भरून आरटीओला कळवावे लागते.
केंद्राने सर्व वाहनांमध्ये भारत सीरिज किंवा ‘बीएच’ नावाने नवीन वाहन नोंदणी चिन्ह सादर केले आहे. नवीन बीएच सीरीज वाहनांना नोंदणीच्या कोणत्याही हस्तांतरणाची आवश्यकता नाही आणि ती देशभरात वैध असेल. ही सुविधा संरक्षण कर्मचारी, तसेच केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचार्यांना स्वैच्छिक आधारावर उपलब्ध असेल. चार किंवा अधिक राज्यांमध्ये कार्यालये असलेल्या खाजगी कंपन्यांचे कर्मचारीही या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. याचा सर्वात मोठा फायदा नोकरीसाठी परराज्यात स्थलांतर करणार्यांना होणार आहे.
बीएच सीरीज अंतर्गत मोटार वाहन कर दोन वर्षांसाठी किंवा 4, 6, 8 वर्षांसाठी आकारला जाईल. खाजगी वाहनांना नवीन राज्यात स्थलांतरित केल्यावर या योजनेमुळे मोफत प्रवास करता येईल. चौदाव्या वर्षानंतर मोटार वाहन कर दरवर्षी आकारला जाईल जो त्या वाहनासाठी पूर्वी गोळा केलेल्या रकमेच्या निम्मा असेल.
नवीन सिरीज जुन्या वाहनांना लागू होणार नसली तरीदेखील नवीन वाहने घेणार्या लोकांसाठी फायद्याची ठरणार आहे.