Breaking News

आशेचा किरण

लॉकडाऊन पुकारल्यानंतर देशातील कोरोना केसेसच्या वाढीचा दर 40 टक्क्यांनी कमी झाला, तर केसेस दुप्पट होण्यास आधीच्या तीन दिवसांऐवजी आता 6.2 दिवस लागत आहेत. केंद्राच्या आरोग्य विभागाने ही विश्लेषणात्मक आकडेवारी शुक्रवारी जाहीर केली. यापाठोपाठच रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो दरात कपात केल्याची बातमी आल्याने देशभरातील लोकांसाठी शुक्रवारचा दिवस काहिसा दिलासादायक ठरला असावा. जसजसे दिवस मागे पडतील तसतसे आकडेवारीच्या विश्लेषणातून कोरोनाच्या फैलावाचा अधिक नेमका अंदाज आपल्याला येत जाईल, असे तज्ज्ञ मंडळी सुरुवातीपासून सांगत होती. यातूनच कोरोना संकटाविरोधातील आपले धोरण साकारणार आहे. शुक्रवारी केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीतून देशातील कोरोनासंबंधी परिस्थितीचे काहिसे दिलासादायक चित्र समोर आले. चीनपाठोपाठ युरोप-अमेरिकेत कोरोनाचे थैमान सुरू झाले आणि त्याच सुमारास आपल्या देशातही कोरोनाचा फैलाव डोके वर काढू लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली केंद्र सरकारने वेगाने निर्णय घेत 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून देशव्यापी लॉकडाऊन घोषित केला. शुक्रवारी देशाने लॉकडाऊनच्या 24व्या दिवसात प्रवेश केला. एव्हाना लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वीची कोरोनासंबंधी स्थिती आणि लॉकडाऊननंतर पडलेला फरक यांचा तुलनात्मक अभ्यास सरकारच्या हाती आला असून त्यानुसार कोरोनाच्या केसेसच्या देशभरातील सरासरी वाढीचा दर लॉकडाऊननंतर 40 टक्क्यांनी घटला आहे. लॉकडाऊनच्या आधी केसेसची संख्या दुप्पट होण्यास अवघे तीन दिवस लागत होते, तर आता त्यास 6.2 दिवस लागत आहेत. 15 मार्च ते 31 मार्च या काळात देशातील कोरोना केसेस सरासरी दोन टक्क्यांनी वाढत होत्या, तर लॉकडाऊननंतर या केसेसच्या वाढीचा हा दर 1.2 टक्क्यांवर आला. या दोन्ही संदर्भातील विश्लेषणात्मक आकडेवारी ही सरासरीवर आधारित असली तरी लॉकडाऊनचा देशाने निवडलेला मार्ग योग्यच आहे यावर ती निश्चितपणे शिक्कामोर्तब करते. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या आकडेवारीसोबतच मुंबईतील नव्या कोरोनाबाधितांची शुक्रवारची संख्याही आशेचा किरण घेऊन आली. गेल्या सात दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी प्रथमच मुंबईतील नव्या कोरोना केसेसचा आकडा खाली गेलेला दिसला. अर्थात या दिवशीही 77 नव्या रुग्णांची नोंद झाल्यानेेे अद्याप आपली लढाई संपायला अवकाशच आहे. तेव्हा आपण कुणीही गाफील राहून अजिबातच चालणार नाही. याच दिवशी पनवेलमध्ये पाच नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. श्रीवर्धनमधील एक नवी केस लक्षात घेता रायगडमधील एकूण केसेसची संख्या आता 38 झाली आहे. देशभरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 14 हजारांच्या समीप पोहचली असून मृतांची संख्या 452वर गेली आहे. कोरोनाविरोधातील आपली ही लढाई दीर्घकाळ चालणार हे लक्षात घेऊन देशात अनेक स्तरावर सर्वसामान्यांना दिलासा देणार्‍या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रिझर्व्ह बँकेने दुसर्‍यांदा मदतीच्या उपाययोजनांची घोषणा केली, तसेच रिव्हर्स रेपो दरातही 25 बेसिस पॉइंटची घट केली. हा दर आता आधीच्या चार टक्क्यांवरून 3.75 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. जागतिक स्तरावर जर्मनीनेही कोरोनाची साथ ही नियंत्रणात आणण्याजोगी असल्याचे म्हटले आहे. आपल्या देशातही कोरोनासंबंधी परिस्थिती नियंत्रणात आणायची असल्यास नागरिकांनाही लॉकडाऊनच्या निर्बंधांचे कसोशीने पालन करून सरकारच्या प्रयत्नांना हातभार लावावा लागेल.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply