Breaking News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील शेतकर्‍यांनी घ्यावयाची खबरदारी…

काजू फळधारणा अवस्था : काजू बिया पूर्ण तयार झाल्यावरच बियांची काढणी करावी. काढणी केलेल्या बिया उन्हामध्ये 7 ते 8 दिवस वाळवून साठवणूक करावी.

* नवीन लागवड केलेल्या काजू कलमांना दर आठ दिवसांनी प्रती कलम 15 लिटर पाणी देण्याची व्यवस्था करावी. तसेच कलमांच्या आळयातील पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यासाठी आळयामध्ये वाळलेले गवत, पालापाचोळा किंवा पोलीथीनचे आच्छादन करावे.

* काजूमध्ये रोठा या किडीचा (खोडकिडीचा) प्रादुर्भाव झाडाचे खोड व उघडी मुळे यावर दिसून येण्याची शक्यता असल्याने रोठयाची कीड झाडाची साल पोखरून आतील गाभा खाते. रोठयाच्या प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी 15 एम. एम. पटाशीच्या सहाय्याने प्रादुर्भित साल काढून झाडातील रोठयाला बाहेर काढून मारून टाकावेत व प्रवाही क्लोरपायरीफॉस 20 टक्के 50 मि.ली. प्रती 10 लिटर या प्रमाणात द्रावण तयार करून प्रादुर्भित भाग द्रावणाने चांगला भिजवावा. झाडाला कोणत्याही प्रकारे इजा करू नये व इजा झाल्यास त्याला बोर्डो पेस्ट लावून जखम झाकावी.

* काजू नवीन लागवड करावयाच्या क्षेत्रामध्ये साफ सफाई करून घ्यावी.

   नारळ : तापमानात वाढ व आर्द्रतेत घट संभवत असल्याने नारळ बागेस 5 ते 6 दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी तसेच आळयामध्ये ओलावा टिकविण्यासाठी नारळाच्या शेंडया पुराव्यात आणि झावळयांचे आच्छादन करावे. नवीन लागवड केलेल्या नारळाच्या रोपांची कडक उन्हामुळे पाने करपू नयेत म्हणून रोपांना वरून सावली करावी.

*  नारळावर इरीओफाईड कोळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असल्याने कोळीच्या प्रादुर्भावाने नारळ फळाच्या देठाखालच्या भागात पांढरट, पिवळे, त्रिकोणी चट्टे दिसून येतात व नंतर चट्टे वाढत जाऊन त्रिकोणी आकाराचे होतात. प्रादुर्भित भागावरील फळांचे आवरण तडकते परिणामी नारळ लहान राहतात तसेच लहान फळांची गळ होते. किडीच्या नियंत्रणासाठी 5 टक्के कडूनिंबयुक्त (अझाडीराक्टीन) किटकनाशक 7.5 मि.ली. सम प्रमाणात पाण्यात मिसळून मुळाद्वारे देण्यात यावे. औषध दिल्यानंतर 45 दिवसांपर्यंत नारळ काढू नयेत. याशिवाय नारळावर 1 टक्का कडुनिंबयुक्त किटकनाशक (निमाझोली) 4 मि.ली. प्रती लिटर पाण्यातून नारळाच्या घडावर पडेल अशी फवारणी करावी. फवारणी करण्यापूर्वी सर्व किडग्रस्त व तयार नारळ काढून घ्यावेत. पडलेले फळे, फुलोरा गोळा करून नष्ट करावेत.

    सुपारी : तापमानात वाढ व आर्द्रतेत घट संभवत असल्याने सुपारी बागेस 4 ते 5 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

* दक्षिण दिशेकडील उन्हापासून सुपारीच्या खोडाचे संरक्षण करण्यासाठी खोडावर गवत पेंढा किंवा सुपारीची झावळी बांधावी.

  दुभती जनावरे : जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित राहण्यासाठी जनावरांना ताजे स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात देण्यात यावे तसेच उष्णतेचा दाह कमी करण्यााठी वैरणीवर 1 टक्के गुळपाणी आणि 0.5 टक्के मीठ यांचे स्वतंत्र द्रावण करून शिंपडावे.

* तापमानात वाढ संभवत असल्याने उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी गोठयाचे शेडचे छप्पर गवत, भाताचा पेंडा किंवा नारळाच्या झावळया यांनी झाकून त्यावर अति उन्हाच्या वेळी पाणी पडेल अशी व्यवस्था करावी तसेच वारा वाहत असलेल्या दिशेने गोठयाच्या बाजूस पाण्यात भिजवलेले बादरान किंवा गोणपाट बांधावे.

* उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करण्याकरीता दुपारच्या वेळी जनावरांना अंगावर थंड पाणी शिंपडावे त्यामुळे शरीराचे तापमान कमी होईल.

कुक्कुटपालन : कुक्कुटपालन शेड मध्ये पाण्याची भांडी वाढवावी व पिण्यासाठी स्वच्छ आणि थंड पाण्याची मुबलक प्रमाणात देण्यात यावे. तसेच खाद्य सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस देण्यात यावे.

* तापमानात वाढ संभवत असल्याने उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी कुक्कुटपालन शेडचे छप्पर गवत, भाताचा पेंडा, किंवा नारळाच्या झावळया यांनी झाकून त्यावर अति उन्हाच्या वेळी पाणी पडेल अशी व्यवस्था करावी तसेच वारा वाहत असलेल्या दिशेने शेडच्या बाजूस पाण्यात भिजवलेले बारदान किंवा गोणपाट बांधावे.

– डॉ. मनोज तलाठी,

कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, कल्ला-रोहा, कृषीविषयक सल्ला

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply