पनवेल प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पनवेल : वार्ताहर – पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमधील वाढती गर्दी पाहून 10 एप्रिल पासून कृषी उत्पन्न बाजार बंद करण्याच्या निर्णय जिल्हा उपनिबंधक यांनी केला होता. मात्र जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा पडू नये, म्हणून पुन्हा हा बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार येत्या दोन दिवसात पनवेल कृषी बाजार समिती सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे. तसेच हा बाजार खांदेश्वर येथील सर्कस ग्राऊंडमध्ये सुरू होणार आहे. या नवीन ठिकाणी फक्त भाजी पाला हा विक्री खरेदी केंद्र असणारा आहे. तर दाना मार्केट हा जुन्याच जागी सुरू राहणार आहे.
पनवेलमधील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर देखील पनवेलमधील या बाजार समितीमध्ये सकाळी भाजी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होऊन लागली होती. पनवेल पालिका प्रशासन तसेच पोलिसांकडून आवाहन करून देखील ही गर्दी काही केल्या कमी होताना दिसून येत नव्हती. तसेच या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या आवाहनाला हरताळ फासली जाऊ लागली होती. त्यामुळे हे गर्दीचे ठिकाण कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू नये, म्हणून प्रशासनाने जाहीरपत्रक काढून हे बंद करण्याचे आवाहन केले होते.
केवळ दाणा मार्केट सुरू
10 एप्रिलपासून बंद ठेवण्यात आलेले हे मार्केट आता नवीन ठिकाणी सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार हा बाजार खांदेश्वर येथील सर्कस ग्राउंड मध्ये सुरू करण्यात येणार आहे. त्या सोबत या ठिकाणी नवीन निर्णया नुसार केवळ भाजी पाला विक्री आणी खरेदी सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी भाजीपाल्याच्या गाड्या देखील खाली करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे. तसेच पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता पुढील निर्णय येईपर्यंत केवळ दाणामार्केट सुरू राहणार आहे.