माणगाव : प्रतिनिधी
गभरात कोरोना विषाणूंच्या साथीने सारे जनजीवन विस्कळीत झाले आहे. साथीचा फैलाव होऊ नये यासाठी शासनाने सर्व शाळांना सुटी जाहीर केली आहे. शासनाच्या धोरणानुसार सर्वच शाळांतील विद्यार्थी सुटीवर घरी आहेत. मात्र अनेक शाळेतील विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून त्याला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थी शैक्षणिक वातावरणापासून दूर जाऊ नयेत यासाठी शाळा, शिक्षक व पालकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांना घरच्या घरी अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. त्यासाठी पालकांच्या व्हॉट्सअॅपचा, फेसबुकचा व मोबाइल संदेशांचा उपयोग केला जात आहे. या माध्यमांवर विद्यार्थ्यांना शिक्षक दररोज अभ्यास देतात व त्याची तपासणी करतात. शंका, चुका दुरुस्तीसाठी प्रत्यक्ष संपर्क करून व्हिडिओ कॉलद्वारे बोलतात. विद्यार्थी या संकल्पनेला चांगला भरभरून प्रतिसाद देत आहेत. जिल्ह्यातील उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षकांनी या आधुनिक तंत्रज्ञान साधनांचा उपयोग केला आहे. यामुळे विद्यार्थी अभ्यासात रमले असून शैक्षणिकदृष्ट्या त्यांचे नुकसान होत नसल्याने पालक व शिक्षणप्रेमी समाधानी आहेत.
आम्ही आमच्या शाळेतील या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यास घेत आहेत. प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सोडविण्यास दिलेल्या आहेत आणि विद्यार्थी त्या नियमित सोडवून आपल्या वर्ग शिक्षकांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनच सोडवून दाखवत आहेत. त्यामुळे पालक अतिशय समाधानी असल्याचे दिसून येत आहे. या उपक्रमाबद्दल ग्रामस्थ व मुंबई मंडळ बनोटी, शाळा व्यवस्थापन समिती बनोटी, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
-तृप्ती सावंत, शिक्षिका, राजिप शाळा बनोटी, ता. म्हसळा