कर्जत : प्रतिनिधी
तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी शिवसेनेच्या जयश्री मानकामे यांचा पराभव करून विजय मिळविला. उपसरपंच पदासाठी सोमवारी (दि. 20) निवडणूक घेण्यात आली आणि त्यात म्हसकर यांना 11, तर शिवसेनेच्या मानकामे यांना सहा मते मिळाली. पक्षांतर्गत समझोत्यानुसार शंकर घोडविंदे यांनी राजीनामा दिल्याने नेरळ ग्रामपंचायतीचे उपसरपंचपद रिक्त झाले होते. या रिक्त पदासाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली. पीठासन अधिकारी सरपंच उषा पारधी यांच्याकडे निर्धारित वेळेत मंगेश राजाराम म्हसकर, जयश्री मनोज मानकामे, शारदा अरुण साळेकर यांचे अर्ज दाखल झाले होते. दुपारी दोन वाजता उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी विशेष बैठक सुरु झाली. त्यावेळी शारदा साळेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे उपसरपंच पदासाठी मंगेश म्हसकर (भाजप) आणि जयश्री मानकामे (शिवसेना) यांच्यात निवडणूक घेण्यात आली. गुप्त मतदान प्रक्रियेत म्हसकर यांना 11 तर मानकामे यांना सहा मते मिळाली. त्यामुळे मंगेश म्हसकर यांची नेरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी सरपंच उषा पारधी यांनी जाहीर केले. मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पीठासीन अधिकारी पारधी यांना ग्रामविकास अधिकारी गणेश गायकर यांनी मदत केली. या निवडणुकीत जयश्री मानकामे यांना मतदान करावे, यासाठी शिवसेनेने आपल्या सर्व सदस्यांना व्हीप बजावला होता, मात्र रायगड जिल्हा प्रमुखांचा हा व्हीप शिवसेनेच्या काही सदस्यांनी मानला नसल्याचे स्पष्ट झाले. नेरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाल्यांनतर मंगेश म्हसकर यांचे अभिनंदन करण्यासाठी भाजप आणि शेकापचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यात रायगड जिपचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, सदस्य नारायण डामसे, माथेरानचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, भाजप तालुका सरचिटणीस संजय कराळे, माथेरान शहर अध्यक्ष प्रवीण सकपाळ, जिल्हा परिषद प्रभागाचे अध्यक्ष संदीप म्हसकर, महिला मोर्चाच्या रायगड जिल्हा सरचिटणीस मृणाल खेडकर आदींचा समावेश होता.