Breaking News

खोपोली शहर ठप्प; अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद; 24 तास नाकाबंदी

खोपोली : प्रतिनिधी

कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून खोपोलीतील चार प्रभाग प्रशासन व पोलिसांकडून पूर्ण सील करण्यात आले असून, अन्य भागातील रहदारीही रोखण्यात आली आहे. ठरावीक औषधी दुकाने व काही दवाखाने सुरू असले तरी नागरिकांना होम क्वारंटाइन केले असल्याने संपूर्ण शहर सध्या ठप्प आहे.

कोरोनाचा एक रुग्ण व त्याच्याशी जवळपास 18 लोकांचा थेट, तर 25 ते 30 लोकांचा कोणत्या ना कोणत्या कारणांनी आलेला संबंध यामुळे खोपोली शहरात कोरोना प्रवेशाची छाया गडद बनली आहे. या सर्वांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले असून त्यांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अजून काही संपर्कातील लोकांचा शोध सुरू आहे. दुसरीकडे प्रमुख मार्गांसह अंतर्गत रस्ते व सर्व वाटा सील करण्यात आल्या आहेत.

शहरातील 11 व 12 असे दोन प्रभाग कोरोनाबाधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहेत. या परिसरात 25 तारखेपासून पुढील 28 दिवस नागरिकांना सक्तीने घरात राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून देण्यात आले आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी प्रशासन व पोलीस सर्व त्या उपाययोजना करीत आहेत. पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, प्रांताधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी सोमवारी दुपारनंतर संपूर्ण शहरातील व्यवस्थापन व केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेऊन कोरोनाबधितांची संख्या एकवरच ठेवण्यासाठी कडक निर्देश दिले आहेत.नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. रस्त्यावर कोणत्याही कारणासाठी फिरण्यास पूर्ण मनाई करण्यात आली आहे. खोपोलीतील कोणीही नागरिक शहराबाहेर जाणार नाही व बाहेरील कोणीही नागरिक शहरात येणार नाही यासाठी पोलीस यंत्रणेकडून जागोजागी 24 तास नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण शहर ठप्प झाले आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply