पनवेल : वार्ताहर – लॉकडाऊन हा 3 मेपर्यंत वाढविण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक घरातच वास्तव्यास आहेत. अशा लोकांना ऑनलाइनच्या माध्यमातून फसवणुकीच्या प्रकाराला सुरूवात झाली असून त्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येवू लागल्या आहेत.
त्यामध्ये प्रामुख्याने ऑनलाइन दारु खरेदी करा, ऑनलाइन आंबे खरेदी करा, वेगवेगळ्या योजना, पैसे गुंतवणुकी संदर्भात आकर्षक योजना, नोकरी संदर्भातील योजना, तसेच इतर वस्तू खरेदीच्या योजना या ऑनलाइनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचू लागल्या आहेत. अनेकांना लॉकडाऊनचे आमिष दाखवून स्वस्त दरात वस्तू विकत असल्याचे सांगत प्रथम अकाऊंटमध्ये पैसे जमा करा व आमचा माणूस तुमच्या घरपोच वस्तू आणून देईल, असे आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार सुरू झाले असून या फसवणुकीला अनेकजण बळी पडू
लागले आहेत.
अनेकांनी पैसे ट्रान्सफर केले आहेत. परंतु अद्याप त्यांना घरपोच वस्तू मिळाल्या नाहीत आहेत. तर आलेला फोन किंवा अकाऊंट नंबर बंद अवस्थेत आहेत. अशावेळी ती व्यक्ती नजिकच्या पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत आहेत व आपल्या तक्रारी नोंदवित आहेत. परंतु सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये पोलीस यंत्रणा रस्त्यावर जास्त काळ असल्याने तक्रारी अनेक ठिकाणी नाकारल्या जात आहेत. त्यामुळे लोकांनी अशा फसव्या योजनांना किंवा आमिषाला बळी पडू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.