कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार
संचारबंदी असतानाही बुधवारी (दि. 22) मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 45 जणांना कर्जत पोलिसांनी पकडले. त्यांची ही पहिलीच वेळ असल्याने समज देऊन आणि कवायती, योगासने करवून घेत त्यांना सोडून देण्यात आले. दोन दिवसांपूर्वी नेरळ पोलिसांनी 33 जणांना मॉर्निंग वॉकसाठी निघाल्यानंतर पकडले होते.
कर्जत शहरातील लोक हे प्रामुख्याने कर्जत-मुरबाड, कर्जत-चौक, कर्जत-नेरळ तसेच मालवाडी रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतात. त्याच वेळी सर्वाधिक लोक कचेरी टेकडीवर चालायला जातात. पोलिसांनी त्यातील बहुतेक ठिकाणी सकाळी जाऊन 45 जणांची धरपकड केली. यात 38 पुरुष आणि सात महिलांचा समावेश होता. या सर्वांना कर्जत पोलीस ठाणे येथे आणण्यात आले आणि तेथे पोलिसांनी त्यांच्याकडून कवायती करून घेतल्या. शेवटी सर्वांची नावे घेऊन व समज देऊन सोडण्यात आले. यापुढे कोणी विनाकारण फिरताना आढळल्यास गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.