पोलादपूरच्या दिविल येथील घटना
पोलादपूर : प्रतिनिधी
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रानडुकरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून दिविल गावातील एक कुटुंब रानात लाकूडफाटा गोळा करायला गेले असता एका रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना गुरुवारी (दि. 23) सकाळी घडली. या हल्ल्यात आई, मुलगा व दीर असे तिघे जखमी झाले आहेत.
दिवील येथील नामदेव भिल्लारे, भाऊ कृष्णा भिल्लार, भारती दिलीप भिल्लारे या दीर-भावजयीसह मुलगा ओंकार भिल्लारे असे एकाच कुटुंबातील चार सदस्य सरपणाची लाकडे गोळा करण्यासाठी सकाळी जंगलात गेले होते. त्या वेळी एका रानडुकराने अचानक त्यांच्यरावर हल्ला चढविला. तेव्हा नामदेव भिल्लारे यांनी झाडावरून चढून स्वत:चा बचाव केला, मात्र अन्य तिघे जखमी झाले. ते रक्तबंबाळ अवस्थेत कदमवाडी बाजुच्या रानातून येत असताना दिविल ग्रामस्थांना दिसले. तिघांनाही महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील भाऊ कृष्णा भिलारे व भारती भिलारे या दोघांना महाडमधून मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले आहे.