Breaking News

खालापुरातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली

अनेक घरे गाडली गेली, 12 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

खोपोली, खालापूर,चौक ः प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील चौकजवळील इर्शाळगडावर असणार्‍या आदिवासीवाडीवर बुधवारी रात्री 11.30च्या सुमारास डोंगराचा एक मोठा भाग कोसळून अनेक घरे मातीच्या ढिगाराखाली गाडली गेल्याची भयंकर घटना घडली. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शासकीय यंत्रणा व सामाजिक संस्था मदतकार्यासाठी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
बुधवारची रात्र इर्शाळवाडीतील रहिवाशांसाठी काळरात्र ठरली. रात्री 11.30च्या सुमारास डोंगराच्या वरच्या बाजूने मोठा आवाज झाल्याने गावातील शाळेत असलेल्या तरुणांनी तत्काळ आरडाओरड करून ग्रामस्थांना सावध करण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी आवाज ऐकला ते गावाच्या बाहेर आले, पण तोपर्यंत वेगाने मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा खाली येऊन अनेक घरांवर पडला होता. ही बाब तरुणांनी खालच्या वाडीवर येऊन सांगितल्यानंतर वार्‍यासारखे हे वृत्त सर्वत्र पसरले. शासकीय यंत्रणा, तहसीलदार, पोलीस विभाग, तसेच खोपोलीतील अपघातग्रस्त मदत टीम, यशवंती हायकर्स तसेच इतर सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, पालकमंत्री उदय सामंत, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी व अन्य लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व आढावा घेतला.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply