Breaking News

नवी मुंबईत बस स्थानकांवर लांबच लांब रांगा

पनवेल : बातमीदार

टाळेबंदी शिथिलीकरणानंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील सर्व व्यवहार आता पूर्ववत सुरू झाले आहेत. नागरिकांनाही आता कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत आहे. मात्र या शहरांची जीवनवाहिनी असलेली लोकल मात्र अद्याप सुरू करण्यात न आल्याने नवी मुंबईतून मुंबई, ठाण्यात प्रवास करताना नोकरदारांचे नाकेनऊ येत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सर्व ताण त्या त्या शहरातील परिवहन व्यवस्थेवर आला आहे. नवी मुंबईतील बस स्थानकांवर सकाळी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. तास, दोन तासांनी बससाठी नंबर येत असल्याने कामाच्या वेळा पाळताना नोकरदारांची कसरत सुरू आहे. दहा वाजता कार्यालयात पोहचण्यासाठी नवी मुंबईतील बस स्थानकांवर सकाळी सात वाजताच रांगेत उभे राहावे लागत असल्याचे प्रवासी सांगत आहेत.

नवी मुंबई शहरातून ‘एमएमआर’ क्षेत्रामध्ये जाणार्‍या नोकरदारांचे सध्या मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत. नवी मुंबईतून लाखो नोकरदार, नागरिकांना मुंबई व शेजारील उपनगरांत कामासाठी जात आहेत. त्यात ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवलीतील नोकरदारही नवी मुंबईतून मुंबईत जात आहेत. त्यामुळे सध्या नवी मुंबईतील बस स्थानकांवर रांगा लागलेल्या दिसत आहेत. वाशी, सानपाडा, नेरुळ, बेलापूर, कोपरखरणे, ऐरोली, घणसोली येथील बस स्थानकांवर सकाळपासूनच प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. ‘एनएमएमटी’च्या सध्या 325 बस शहराअंतर्गत फेर्‍यांबरोबर मुंबई, ठाण्यातही फेर्‍या करीत आहेत. मात्र वाढलेल्या प्रवाशांच्या तुलनेत त्या अपुर्‍या पडत आहेत. त्यात कोरोनामुळे बसमधील प्रवाशांची संख्याही मर्यादित असल्याने तासंतास बसची वाट पाहात थांबावे लागत आहे.

सध्या अत्यावश्यक सेवेसाठी लोकल धावत असली तरी कमी फेर्‍या होत असल्याने या सेवेतील नोकरदारही बसने प्रवास करीत आहेत. हार्बर मार्गावर प्रवाशांच्या तुलनेत कमी गाडया धावत आहेत. अप आणि डाऊन मार्गावर मिळून 92 फेर्‍या होत आहेत. तर ट्रान्स हार्बर मार्गावर सुरुवातीला फक्त दोन फेर्‍या होत होत्या आता 1 ऑक्टोबरपासून चार फेर्‍या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे उपनगरीय रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी होत आहेत.

याबाबत नवी मुंबई परिवहन प्रशासनाने सांगितले की, प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यात कोरोनामुळे एका बसमध्ये कमी प्रवासी न्यावे लागत असल्याने ही गैरसोय सुरू आहे. ‘एनएमएमटी’च्या 60 टक्के बस नवी मुंबई बाहेरील मार्गावर धावत आहेत.

वेळ व पैसा दोन्ही जातो!

बस किंवा खासगी वाहनासाठी तासनतास थांबावे लागते. यात वेळ जातोच शिवाय खिशाला आर्थिक फटकाही बस असल्याचे प्रवाशांनी सांगितले. उलवेवरून महापेत येणार्‍या स्वप्ना नाईक यांनी सांगितले की, रिक्षाने नेरुळ स्टेशनपर्यंत यावे लागते. तिथून पुन्हा रिक्षा करून नेरुळ एलपीपर्यंत जावे लागते. तेथून बस पकडून महापेत कामाच्या स्थळी. ही परवड गेले काही दिवस सुरू आहे. यात वेळ तर जात आहेच शिवाय आर्थिक फटकाही बसत आहे.

रेल्वेसेवा बंद असल्यामुळे खासगी गाड्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर असतात. त्यामुळे वाहतूककोंडी होते. प्रदूषणात वाढ होते. रेल्वेच्या ठरावीक गाड्यांमुळे लवकर घर सोडावे लागते. एक गाडी चुकली तर तासनतास खोळंबा होतो. त्यामुळे बसने प्रवास करावा लागतो. रेल्वेचे एम इंडिकेटर अ‍ॅपवर चुकीच्या वेळा दाखवल्या जातात. त्यामुळे अडचण निर्माण होते.

-नितीन वाघमोडे, कळंबोली

नेरुळ बस स्थानकातून बसने चेंबूरला जातो. अत्यावश्यक सेवेत काम करतो. परंतु कामावर जाण्यापूर्वी दीड तास आधी घर सोडावे लागते. नेरुळ बस स्थानकात रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. अनेक दिवसांपासून ही परवड सुरू आहे. रेल्वे सुरू झाल्याशिवाय यावर पर्याय नाही.

-हाफिज सय्य्द, नेरुळ, प्रवाशी

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply