वाहन कंपनीकडून घरोघरी केली जातेय रुग्णांची तपासणी
अलिबाग : प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. दररोज वाढणार्या रूग्णसंख्येमुळे हॉस्पिटल, डॉक्टर आणि प्रशासनावरील ताण वाढत आहे. या समस्येच्या अनुषंगाने पुणे येथील वाहन कंपनी फोर्स मोटर्सने भारतीय जैन संघटना (बीजेएस) यांच्या समवेत महाराष्ट्रात डॉक्टर आपल्या दारी उपक्रमामार्फत फिरत्या दवाखान्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 1 एप्रिल रोजी या उपक्रमाची सुरूवात झाली. तेव्हापासून आजतागायत या अंतर्गत तब्बल एक लाख 11 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली.
या उपक्रमात डॉक्टर, मदतनीस, औषधांनी सुसज्ज वॅन्समध्ये 30 फिरत्या दवाखान्यांची सोय करण्यात आली आहे. पूर्व-सूचित वेळापत्रकानुसार हे फिरते दवाखाने आर्थिकदृष्ट्या कमकुवत भागात जातात. या व्हॅनमध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय मदतनीसांची संपूर्ण टीम सुसज्जित असून, करोनाची लक्षणे रुग्णांमध्ये तपासण्यात येतात. ज्या रुग्णांमध्ये थेट संसर्ग आढळून येतो, त्यांना नियुक्त करण्यात आलेल्या रुग्णालयांत पाठवले जाते.
डॉक्टरांनी लिहून दिलेली किंवा उपलब्ध करून देण्यात येण्यात येणारी सर्व औषधे मोफत पुरवली जात आहेत. दरदिवशी मोबाईल युनिटसमध्ये 2500 लोकांची तपासणी करण्यात येते.