उरण : वार्ताहर
जासई परिसरातील भाजपचे उमदे नेतृत्व समजले जाणारे जासई विभागीय भाजपचे अध्यक्ष मेघनाथ म्हात्रे यांचे वयाच्या 45व्या वर्षी रविवारी (दि. 25) अल्पशा आजाराने निधन झाले. युवा नेतृत्व हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. कै. मेघनाथ म्हात्रे यांच्या पार्थिवावर जासई गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मेघनाथ म्हात्रे हे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांचे निकटवर्ती होते. त्यांनी विभागात भारतीय जनता पक्ष मोठा करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली. मेघनाथ म्हात्रे यांच्या अंत्यविधीसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, रायगड जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष चंद्रकांत घरत, वाहतूक सेल जिल्हा अध्यक्ष सुधीर घरत, कामगार नेते सुरेश पाटील, नगरसेवक राजेश ठाकूर, पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, पंडित घरत व पंचक्रोशीतील भाजप कार्यकर्ते, जासई ग्रामस्थ, मित्र परिवार उपस्थित होता.
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळास देण्यासाठी उभारलेल्या आंदोलनात मेघनाथ म्हात्रे यांनी हिरिरीने सहभाग घेतला होता. गेले काही दिवस त्यांच्यावर मुंबई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, परंतु त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. जासईचे उपसरपंच म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध समाजोपयोगी क्षेत्रात मेघनाथ म्हात्रे यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या निधनाने आमचे एक ताकदीचे युवा नेतृत्व हरपले आहे.
-लोकनेते रामशेठ ठाकूर