श्रीवर्धन : प्रतिनिधी – श्रीवर्धन शहरासह तालुक्यातील वीजपुरवठा वारंवार खंडित होणे नित्याचेच झाले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असून, संचारबंदीही लागू आहे. त्यामुळे लोक घराबाहेर पडत नाहीयेत. अशा वेळी महावितरणने वीजपुरवठा अखंडित सुरू ठेवणे आवश्यक आहे, मात्र वीजपुरवठा वारंवार खंडित का होतो याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. त्यातच लॉकडाऊन व संचारबंदीमुळे सर्व नागरिक आपापल्या घरांमध्ये बंद आहेत. सर्व सदस्य एकत्र घरात असल्यानंतर वीजपुरवठा खंडित झाल्यावर घरातील उष्णतेचे प्रमाण अधिकच वाढते. तालुका प्रशासनाने वारंवार वीजपुरवठा खंडित का होतो याबाबत महावितरणच्या अधिकार्यांकडे चौकशी करून नागरिकांना जास्तीत जास्त वेळ वीजपुरवठा सुरू राहील असे पाहावे.
दिवसा वीजपुरवठा एक ते दीड तास, दोन तास, इतका खंडित होतो, तर रात्रीच्या वेळेसदेखील 20 मिनिटे, एक तास एवढा वेळ वीजपुरवठा खंडित होतो. वीजपुरवठा खंडित झाल्यावर घरातील लहान मुले, वृद्धांना अधिक त्रास जाणवतो. या संदर्भात महावितरणच्या अधिकार्यांकडे दूरध्वनीवर संपर्क साधला असता, इन्कमिंग लाईन नादुरुस्त झाली आहे तिचे काम झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत होईल, असे उत्तर मिळते. महावितरणच्या अधिकार्यांनी वीजपुरवठा जास्तीत जास्त वेळ सुरळीत राहील यासाठी प्रयत्न करण्याचा सूर व्यक्त होत आहे.