पालीतील दोन तरुणांचा पराक्रम
पाली : प्रतिनिधी – सुधागड तालुक्यातील डोंगर रानावनात, जंगलभागात सातत्याने वणवे लागण्याच्या घटना समोर येतात. यामध्ये वनसंपदा व जैवविविधतेचे अपरिमित नुकसान होते. अशाच प्रकारे सरसगड किल्ल्यावर वणवा लागला होता. हा वणवा अधिक पसरला असता तर कदाचित मानवी वस्तीजवळ पोहोचला असता तसेच वृक्षराजी आणि पशू-पक्ष्यांचीदेखील हानी झाली असती, परंतु येथील ज्ञानेश्वर जगताप व अमित निंबाळकर या दोन तरुणांनी जीवाची बाजी लावत हा वणवा विझविला. त्यामुळे अनर्थ टळला. या तरुणांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सायंकाळी किल्ल्याला लागलेली आग भास्कर दुर्गे व राजेश इंदुलकर यांनी विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र नंतर ही आग पुन्हा भडकली व उग्र होत गेली. याबाबत अमित निंबाळकर यांनी आपला चित्तथरारक अनुभव सांगितला. रात्री जेवण करून शतपावलीच्या तयारीत होतो. तेवढ्यात ज्ञानेश्वर जगतापचा फोन आला. त्याने किल्ल्यावरील वणवा विझवायला ये म्हणून सांगितले. मग बॅटरी घेऊन तडक किल्ल्याच्या दिशेने निघालो. वरच्या माळावर पोहचलो तर ज्ञानेश्वर एकटाच दिसला. म्हटले अजून कोण आहे का? त्याने दोघा-तिघांची नावे घेतली व म्हटले येतील ते येतील. आग वाढली तर जास्त वर जाता येणार नाही. मग दोघांनीही कोयता घेऊन सरळ आगीच्या दिशेने कूच केली. ज्ञानेश्वर बूट घालून तयारीत आला होता. मी मात्र साधी स्लीपर घालून आलो होतो. समोर फक्त आग दिसत होती आणि जाऊन विझवायची आहे एवढच डोक्यात होत. बघता बघता दोघांनी काम फत्ते केले.
पाली वनविभागाचे वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी तरुणांचे अभिनंदन केले तसेच सुधागड वनक्षेत्रात वणवा नियंत्रणासाठी वन विभागाकडे फायर ब्लोअर्स उपलब्ध आहेत. जिथे वणवा असेल त्या विभागातील आमच्या वनरक्षक, वनपाल किंवा वनक्षेत्र कार्यालयात संपर्क करावा, जेणेकरून आग लगेच आटोक्यात आणता येईल, असेही शिंदे यांनी सांगितले.