Breaking News

पुढच्या वर्षी लवकर या!

गौरी गणपतीला भक्तगणांकडून भावपूर्ण निरोप

अलिबाग ः प्रतिनिधी

लाडक्या गणेशाची पाच दिवस मनोभावे पूजा-अर्चा केल्यानंतर रायगडकरांनी सोमवारी (दि. 5) त्याला  भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. गणपतींसोबत गौरींचेही वाजतगाजत विसर्जन करण्यात आले. सायंकाळी  गणेश विसर्जन मिरवणुका विसर्जनस्थळी निघाल्या. रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या. विसर्जन काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. समुद्रकिनारी असलेल्या शहरांमध्ये तसेच गावांमध्ये समुद्रामध्ये विसर्जन करण्यात आले, तर काही गावांमध्ये तळे, नदी,  ओढ्यात गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले. पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्जव करीत ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकांमध्ये गुलालाची उधळण होत होती. ढोल-ताशा, नाशिक बाजा, बेन्जोच्या तालावर थिरकत मिरवणुका पुढे सरकत होत्या. दक्षिण रायगडमधील महाड, श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा, मुरूड, रोहे तालुक्यांमध्ये मिरवणुकांमध्ये पारंपरिक सनई खालूबाजा आणि त्यावर लेझीम घेऊन नाचणारे गणेशभक्त पहायला मिळत होते. अलिबाग नगर परिषदेतर्फे समुद्रकिनारी गणेशभक्तांच्या स्वागतासाठी खास स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. तेथून गणेशभक्तांना आवश्यक त्या सूचना दिल्या जात होत्या. आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी अलिबागकरांनी समुद्र किनारी गर्दी केली होती.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply