महाडमधील मृत महिलेचा अहवाल आला पॉझिटीव्ह
महाड : प्रतिनिधी
महाड तालुक्यातील बिरवाडी येथील एका महिलेला उपचारासाठी मुंबई येथे दाखल केल्यानंतर मंगळवारी (दि. 28) तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या चार झाली आहे. यापूर्वी खारघर, पोलादपूर आणि कामोठे येथील रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
बिरवाडी येथील महिला गेले काही दिवस शहरातील देशमुख हॉस्पिटलमध्ये डायलिसिसकरिता येत होती. 27 एप्रिलला तिला दम लागल्याने मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यामुळे तिच्या घरातील पाच जण, चालक, डॉक्टर, लॅब टेक्निशियन व इतर अशा एकूण 16 जणांना क्वारंटाइन करून पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.