पेण ः प्रतिनिधी
लॉकडाऊन काळात प्रशासकीय कार्यालय आपापल्या परीने जबाबदारी पार पाडत असतानाच वन विभागासारख्या महत्त्वाच्या कार्यालयातील अधिकार्यांसह पेणमधील सर्पमित्र प्रथमेश म्हात्रे यांनी काही सापांना जीवदान देऊन त्यांना सुरक्षितरीत्या जंगलात सोडले आहे. वाढते शहरीकरण तसेच दिवसेंदिवस उभारण्यात येत असलेल्या सिमेंटच्या जंगलांमुळे सापांचा निवारा नष्ट होत चालला आहे. त्यामुळे हे साप आता नागरिकांना दिसू लागले आहेत, मात्र हे साप न मारता नागरिक त्वरित सर्पमित्र प्रथमेश म्हात्रे यांना फोन केल्यानंतर ते काही क्षणातच तेथे पोहचून सापांना पकडून वन खात्याच्या ताब्यात देत आहेत. पेण वनक्षेत्र कार्यालयाचे वनपाल के. ए. चौधरी, वनरक्षक एन. जी. वार्डे, एस. बी. उगले, पी. आर. साप्टे आणि सर्पमित्र प्रथमेश म्हात्रे यांनी जवळच असणार्या आंबेघर येथील राखीव वन क्रमांक 488मध्ये एक नाग, तीन धामण आणि एका तस्कर जातीच्या अशा पाच सापांना जीवदान दिले आहे. सिटी डेव्हलपमेंटमुळे हे साप खाद्य शोधण्यासाठी लोकवस्तीत येत आहेत, मात्र या सापांना कोणीही न मारता आम्हाला किंवा शहरातील सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.