पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका क्षेत्रात नऊ आणि ग्रामीण भागात दोन पॉझिटीव्ह रुग्ण शनिवारी (दि. 2) आढळल्याने तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांचे शतक पूर्ण झाले आहे. आजच्या रुग्णांमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईला जाऊन पॉझिटीव्ह झालेल्यांच्या घरातील सात रुग्णांचा समावेश आहे. गोवंडी येथील यूएसव्ही फार्मा कंपनीतील कामगार किंवा त्यांच्या घरातील व्यक्तीही यात आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे आता 90 पॉझिटीव्ह रुग्ण झाले आहेत. ग्रामीणमध्ये दोन नवीन रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील रुग्णांची संख्या 104 झाली आहे, तर उरणमधील एक नवा रुग्ण मिळून जिल्ह्याचा आकडा 122वर गेला आहे.
आजच्या पॉझिटीव्हमध्ये कामोठ्यातील सात आणि नवीन पनवेल व कळंबोलीतील प्रत्येकी एकाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. यामध्ये पूर्वीच्या कोरोना पॉझिटीव्हच्या घरातील 7 जणांचा समावेश आहे, तर एकाला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याची शक्यता आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील कामोठ्यात आज सात रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यापैकी सेक्टर 7 मधील रुग्णाचे वडील मुंबईत सफाई कामगार असून, त्यांना कोरोनाची लागण झाली होती. सेक्टर 7 मधील महिला मुंबईला सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. सेक्टर 21 मधील 33 वर्षीय महिला आणि तिची सात आणि एक वर्षीय मुलांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. या महिलेचा पती गोवंडी येथील यूएसव्ही फार्मा कंपनीत कस्टम व्यवस्थापक आहे. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह होता. सेक्टर 11 मधील 32 वर्षीय महिलेचा भाऊ मुंबईला महापालिकेत सफाई कामगार असून, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह होता. सेक्टर 34 मधील 36 वर्षीय व्यक्ती गोवंडी येथील यूएसव्ही फार्मा कंपनीत कामाला आहे.
नवीन पनवेल सेक्टर 17 मधील 22 वर्षीय महिला मेंदू विकाराच्या तपासणीसाठी मुंबईला सायन हॉस्पिटल मध्ये गेली असताना तिला संसर्ग झाला असावा. कळंबोली सेक्टर 4 मधील 35 वर्षीय व्यक्तीचा भाऊ पोलीस कर्मचारी असून त्याच्यामुळे याला संसर्ग झाला असावा. शनिवारपर्यंत पनवेल महापालिका हद्दीतील 1010 जणांची टेस्ट केली आहे. त्यापैकी 64 जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. कोरोना पॉझिटीव्हपैकी 56 जणांवर उपचार सुरू असून, 32 जण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे, तर आतापर्यंत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीणमध्ये शनिवारी दोन नवीन रुग्ण आढळले. उसर्ली येथील मोरया सोसायटीतील मुंबईला फार्मा कंपनीत जाणारी व्यक्ती आणि विचुंबे येथील मोरया पार्कमधील मुंबईला सफाई कामगार असलेलली एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह झाली आहे. तालुक्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 104 झाली असून, पनवेल ग्रामीणमध्ये 14 पैकी पाच रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गोवंडी येथील यूएसव्ही फार्मा कंपनीतील कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसत असल्याने या कंपनीतील कामगार आणि त्यांचे नातेवाईक भयभीत झाले आहेत.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …