माणगाव ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या तिसर्या टप्प्यात काही अंशी सूट मिळाल्याने व आंब्याची आवक वाढल्याने सर्वसामान्यांना परवडतील अशा किमतीत आंबे मिळत आहेत. सर्वसाधारण आकाराने लहान असलेले आंबे 200 रुपये प्रतिडझन, तर चांगल्या प्रतीचे आंबे 400 ते 450 रुपये प्रतिडझन मिळत आहेत. किमती आवाक्यात आल्याने ग्राहकांनी आंबा खरेदी करण्यास प्राधान्य दिले आहे.
उन्हाळा म्हणजे आंब्यांचा सीझन असतो. आबालवृद्ध या मोसमात आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतात. या वर्षी लांबलेल्या पावसाने आंब्यांच्या मोहोराची प्रक्रिया 15 ते 20 दिवस लांबली होती. त्यामुळे आंबा तयार होण्यास एप्रिल महिन्याची प्रतीक्षा करावी लागली, मात्र कोरोनाच्या साथीने व लॉकडाऊनमुळे तयार होणारा आंबा ग्राहकांपर्यंत पोहचण्यास अडचणी येत होत्या. त्यातच या वर्षी आंबा पीक कमी असल्याने सुरुवातीच्या काळात 500 ते 600 रुपये प्रतिडझन आंब्यांचा दर होता. त्यामुळे ग्राहकांनीही आंबा खरेदीकडे पाठ
फिरविली होती.
यंदा आंबा पीक कमी असले तरी चालू हंगामात रत्नागिरी, देवगड व कोकणातील काही भागातून चांगली आवक होत आहे. कोरोनाच्या साथीमुळे थांबलेली बाजारपेठ काही प्रमाणात पुन्हा सुरू झाल्याने किमती कमी झाल्या आहेत. पुढील काही दिवसांत आवक वाढून किमती अजून खाली येतील.
-रूपेश तोडकरी, आंबा विक्रेते, माणगाव