Breaking News

अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

मुंबई ः प्रतिनिधी
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) बुधवारी (दि. 29) आरोपपत्र दाखल केले. विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल करण्यात आलेले हे आरोपपत्र सुमारे सात हजार पानांचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) 21 एप्रिलला या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याच्या आधारावर 11 मे रोजी ईडीने देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. देशमुख सध्या तुरूंगात आहेत. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने यादीतील बार मालकांशी बैठक आयोजित करून डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021मध्ये चार कोटी 70 लाख रुपये जमा केले होते. देशमुख यांच्या सूचनेनुसार त्यांचा खासगी सचिव कुंदन शिंदेला जानेवारी व फेब्रुवारी 2021 या कालावधीत दोन हफ्त्यांमध्ये रक्कम दिली, असा दावा वाझेने केला होता.
देशमुख यांच्या नागपूर येथील श्री साई शिक्षण संस्थेच्या खात्यावर चार कोटी 18 लाख रुपये जमा झाले होते. ते दिल्लीतील चार कंपन्यांमार्फत जमा झाले होते. बार मालकांकडून घेतलेली चार कोटी 70 लाख रुपयांची रक्कम ही तीच असल्याचा ईडीला संशय असून देशमुख यांच्यामार्फत त्यांच्या मुलाकडे व तेथून हवाला मार्फत दिल्लीतील कंपनी व पुढे देशमुख यांच्या शिक्षण संस्थेत जमा झाल्याचा ईडीचा दावा आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply