Breaking News

कोरोनासोबत जगायला शिकूया

एकीकडे देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असताना, नागरिकांनी कोरोनासोबत जगायचे कसे हे शिकले पाहिजे असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. कोरोनाची बाधा टाळण्यासाठी आरोग्य विभागाकडून ज्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत त्यांचा आपल्या वर्तनात पूर्णत: समावेश करून घेतल्यास कोरोनासोबत जगण्याचे आव्हान आपण पेलू शकू.

जगभरातील परिस्थितीशी तुलना करता, भारतातील कोरोना मृत्यूंचा दर हा सर्वात कमी आहे. अशी एखादी दिलासादायक माहिती जाहीर झाली की सर्वसामान्यांच्या मनातील आशा पल्लवित होते. अन्य देशातील रुग्णांशी तुलना करता भारतातील कोरोनाबाधेचे स्वरुप कमी तीव्रतेचे भासते अशी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी निव्वळ 1.1 टक्केच व्हेंटिलेटरवर आहेत, 3.3 टक्के रुग्णांनाच मेडिकल ऑक्सिजन दिला जातो आहे आणि 4.8 टक्के रुग्णांनाच आयसीयुमध्ये ठेवावे लागले आहे. देशातील कोरोनासंबंधी चाचण्यांचे प्रमाणही आता लक्षणीयरित्या वाढले आहे. या आठवड्याच्या प्रारंभी देशात प्रतिदिन 75 हजार टेस्ट होत होत्या तर आता दिवसाला अशा 95 हजार चाचण्या होत आहेत. हे आकडे देशभरात पसरलेल्या 327 सरकारी आणि 118 खाजगी लॅबमधील चाचण्यांचे आहेत. या सार्‍या लॅबमधून आतापर्यंत देशात 13.57 लाख लोकांच्या कोरोना चाचण्या पार पडल्या आहेत. शुक्रवारी देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 56 हजाराच्या पुढे गेलेली होती. कोविडच्या केसेस दुप्पट होण्याचे प्रमाण या दिवशी काहिसे खाली घसरल्यासारखे दिसू लागल्याने यंत्रणेतील संबंधितांमध्ये चिंतेचे वातावरण होते. केसेस दुप्पट होण्याचा दर 12 दिवसांचा असल्याचे मंगळवारी सांगण्यात आले होते. गेले अनेक आठवडे परिस्थितीत सुधारणा होत असल्याचे चित्र कायम राहिले असताना आता अशातर्‍हेने केसेस दुप्पट होण्याचा दर 10.2 दिवसांपर्यंत खाली येणे चिंता वाढवणारे आहे खरे. परंतु पश्चिम बंगालसारख्या काही राज्यांकडून वेळच्या वेळी केसेसची नोंद होत नसल्यामुळे हा फरक दिसतो आहे असेही सांगितले जाते. पश्चिम बंगालला यासंदर्भात सूचना करण्यात आली आहे. आकडेवारीवर लक्ष ठेवून असलेले सर्वसामान्य मात्र अशा तपशीलांमुळे अस्वस्थ होतात. गेले दोन दिवस सलगपणे देशात दिवसाकाठी तीन हजारहून अधिक केसेसची भर पडते आहे. देशातील एकूण कोरोना केसेसची संख्या 56 हजाराच्या पुढे गेलेली असली तरी यापैकी 37,918 केसेसच आता अ‍ॅक्टिव्ह आहेत म्हणजेच प्रत्यक्षात उपचार घेत आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा बरे होण्याचा दरही सातत्याने सुधारत असून एव्हाना तो 29.26 टक्क्यांवर गेला आहे. सुमारे 16 हजारांहून अधिक लोक एव्हाना या आजारातून बरे झाले आहेत. आरोग्य विभागाने सुरूवातीपासून ज्यावर भर दिला आहे अशा मार्गदर्शक तत्त्वांचे नीट पालन केल्यास देशातील कोरोनाचा चढता आलेख सपाट राखण्यात आपल्याला निश्चितपणे यश मिळू शकेल असे आरोग्य मंत्रालयाने नि:संदिग्धपणे म्हटले आहे. लॉकडाऊनचे 44 दिवस उलटून गेल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये आता अस्वस्थता वाढू लागली आहे. हे असेच किती दिवस चालणार, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे हेच खरे तर त्याचे उत्तर आहे. त्यासाठी आवश्यक त्या सगळ्या प्रतिबंधात्मक सवयी आपण अंगी बाणवायलाच हव्या आहेत.

Check Also

‘सामना’ पन्नाशीचा झाला…

काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …

Leave a Reply