Breaking News

खालापुरास पाणीटंचाईचे चटके

ग्रामस्थांचे हाल; टँकरने पाणीपुरवठा सुरू

खोपोली ः प्रतिनिधी

कोरोनाच्या संकटकाळात खालापूर तालुक्याच्या पाचवीला पुजलेले पाणीटंचाईचे संकटदेखील घशाची कोरड वाढवत आहे. ठोस उपचारांअभावी टँकरची मात्रा सध्या देण्यात येत आहे. खालापूर तालुक्यात प्रचंड जलसाठा असतानादेखील पावसाळा संपताच अनेक भागात पाणीटंचाई जाणवते. या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यात वर्षानुवर्षे प्रशासनाला अपयश येत आहे. खालापूर तालुक्याच्या 2019-20च्या पाणीटंचाई कृती आराखड्यात 27 गावे आणि 39 वाड्यांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये 21 गावे आणि 31 वाड्या अशा 52 ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. सध्या तालुक्यातील चिलठण गाव आणि उजळोली व खरवली आदिवासी वाडीला टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय टंचाईग्रस्त यादीत असलेल्या इसांबे, होराळे, परखंदे, झाडाणी, वावर्ले कातकरवाडी, रानसई आदिवासीवाडी, ऊसरोली, ढेबेवाडी व बर्गेवाडीसाठी आदेश प्राप्त होताच टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ गटविकास अधिकारी संजय भोये यांनी सांगितले आहे. सातत्याने खालापूर तालुका पाणीटंचाई यादीत आहे. मागील पाच वर्षांची आकडेवारी बोलकी आहे. टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमध्ये फरक पाहिला तर पाण्याच्या बाबतीत उदासीनता प्रकर्षाने जाणवते. 2016-17 वर्षी पाणीटंचाईग्रस्त यादीत 30 गावे आणि 40 वाड्या मिळून 70 संख्या होती. 2017-18 लादेखील आकडेवारीत काहीच फरक नव्हता. 2018-19 वर्षात 27 गावे आणि 39 वाड्या अशा एकूण 66 ठिकाणी तीव्र पाणीटंचाई होती. 14व्या वित्त आयोगात निधी प्रथम पाणी योजनेवर खर्च करण्याची तरतूद असतानादेखील पाणीप्रश्न सुटत नाही.

टंचाईग्रस्त आराखड्यानुसार आवश्यकतेनुसार टँकरची व्यवस्था करण्यात येत आहे. कोरोनाच्या संकटकाळातदेखील पाणीटंचाई असलेल्या दुर्गम भागात टँकरने पाणी पोहचविण्याकडे आमचे विशेष लक्ष आहे.

-संजय भोये, वरिष्ठ गटविकास अधिकारी, खालापूर पंचायत समिती

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply