आरोग्य प्रहर

कोणतीही सांधेदुखी झाली आणि थोड्या दिवसांत बरी होत नसेल तर युरिक अॅसिड वाढले असे सहजपणे म्हटले जाते. युरिक अॅसिड वाढण्याचा त्रास आणि त्यायोगे होणारा संधिवात हा अनेक तरुण, मध्यमवयीन व्यक्तींना अस्वस्थ करणारा आहे. योग्य प्रकारे पथ्य अवलंबल्यास यातून कायमची सुटका मिळू शकते.
युरिक अॅसिड वाढलेले असताना वा त्याची प्रवृत्ती असताना मका व तत्सम पदार्थ पूर्णत: टाळायला हवेत. कोणत्याही देशातून आलेला, कोणत्याही चवीचा मका युरिक अॅसिडचा त्रास असताना वर्ज्य आहे. उडीद डाळ, चण्याची डाळ, राजमा, वाळवलेले कडवे वाल, गोडे वाल, वाटाणे यांचे सेवन युरिक अॅसिडचे प्रमाण तत्काळ वाढवते. कुळिथाचा वापर वात व्याधीत फायदेशीर असला तरी युरिक अॅसिडद्वारे होणार्या संधिवातात तो वर्ज्य आहे. पालक, चुका अंबाडी, मेथीची भाजी, करडई या पालेभाज्या त्रास वाढवतात. साबुदाणा, भगर, दही हे पदार्थ टाळलेले उत्तम. डाळींच्या पिठाचे डांगरसुद्धा हा त्रास वाढवते. उसाचा रस, चिंचेचा वापर या व्यक्तींनी टाळल्यास फायदा होतो. बाजारात सध्या उपलब्ध असणारे हवाबंद डब्यातील किंवा पाकिटातील पदार्थही टाळावेत. हे पदार्थ टिकवण्यासाठी वापरलेल्या रासायनिक घटकांमुळे युरिक अॅसिडचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. थंड पदार्थ, वात वाढवणार्या पदार्थांचे सेवन करू नये. पाणीपुरीमधील पुरीसुद्धा या आजारात त्रास वाढवते. नासवलेले पदार्थ, त्यातही अनैसर्गिकरीत्या नासवलेले पदार्थ हा आजार असताना खाऊ नयेत. डाळींचा आहारात जास्त वापर करू नये. युरिक अॅसिडच्या त्रासात न खाण्याचीच यादी मोठी असते, हा विचार करून कित्येक व्यक्ती पथ्य सोडतात व व्याधी वाढवून घेतात; परंतु खाण्याचे खूप उत्तम चविष्ट प्रकार युरिक अॅसिड कमी करताना दिसतात. यामध्ये हळदीचा उपयोग अधिक फायदेशीर आहे. विविध भाज्यांत हळदीचे प्रमाण वाढवावे, तसेच हळद व आल्याचे लोणचे नियमित खावे. मूग, मसूर, तूर पाण्यात हळद टाकून त्याचे सूप सेवन केल्यास उत्तम. मूग, मसूर, तूर, मटकी यांचे घट्ट वरण निषिद्ध असले तरी त्याचे शिजवलेले पातळ पाणी ऊर्जा देणारे असून या आजाराचा त्रास कमी करते. बर्याच रानभाज्या खाण्यानेही फायदा होतो. तांदुळका, चाकवत, लाल माठ, शेवगा पाने, सरसू, पुनर्नवा उपयुक्त ठरतात. गुळवेल ही वनस्पती अनेकांना परिचित असेल. त्याच्या पानांची भाजी युरिक अॅसिडच्या त्रासाबरोबरच इतर अनेक उपद्रवात्मक त्रासही कमी करते.