मुंबई : प्रतिनिधी
भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यंदा मुंबई ट्वेन्टी-20 लीगच्या दुसर्या हंगामामध्ये खेळणार आहे. या स्पर्धेसाठीच्या लिलावासाठी डावखुरा वेगवान गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज ही वैशिष्ट्ये जपणार्या 19 वर्षीय अर्जुनच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.
मुंबईच्या 14, 16 आणि 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करणार्या अर्जुनने 2016 मध्ये झालेल्या दुखापतीनंतर आपल्या गोलंदाजीच्या शैलीत बदल केला. प्रशिक्षक अतुल गायकवाड यांनी त्याला शैलीबदलासाठी साहाय्य केले. याशिवाय सुब्रतो बॅनर्जी यांचेसुद्धा त्याला मार्गदर्शन लाभते. 2017-18च्या कूचबिहार करंडक स्पर्धेतील पाच सामन्यांत त्याने 19 बळी मिळवले होते.