रोहे : प्रतिनिधी – शासनाने परप्रांतीय मजुरांना आपल्या राज्यात जाण्यासाठी व्यवस्था केली असून, टप्प्याटप्प्याने या मजुरांना आपल्या राज्याकडे सोडले जात आहे. यातील काही रेल्वेने जात आहेत, तर काहींना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत बसने सोडले जात आहे. अशाच प्रकारे रोह्यातून गुजरात राज्यात 32, तर कर्नाटक राज्यात 80 मजुरांना मंगळवारी
(दि. 12) दुपारी 12च्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसने रवाना करण्यात आले.
रोह्यातून हजारो परप्रांतीय मजूर आपल्या गावी जाण्यासाठी उत्सुक होते. ऑनलाईन अर्ज या मजुरांनी शासनाकडे जमा केल्यानंतर गेल्या शनिवारी 139 मजूर मध्यप्रदेशला रेल्वेने रवाना करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा मंगळवारी गुजरातसाठी रोहा तालुक्यातून 32, तर कर्नाटकसाठी 80 मजूर रवाना झाले आहेत. कर्नाटक राज्यातील मजुरांसाठी चार बस, तर गुजरात राज्यासाठी तीन बस आरक्षित करण्यात आल्या होत्या.
रोहा तालुक्यात व्यवसायनिमित्त तसेच धाटाव, नागोठणे औद्योगिक क्षेत्रात नोकरीनिमित्ताने परप्रांतीय मजूर मोठ्या संख्येने आहेत. यासह तालुक्यात बांधकाम व्यवसायातही मजूर आहेत. या सगळ्यांचे काम सुरळीत चालू असताना कोरोना संकट आले. देशात व राज्यात याचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाऊन, संचारबंदी जाहीर करण्यात आली. त्यामुळे कारखाने बंद झाले. परिणामी कामासाठी परप्रांतातून आलेल्या मजुरांचा रोजगार बुडाला अणि उदरनिर्वाहाचा प्रश्न पुढे आला.
काम बंद झाल्याने परप्रांतिय कामगारांना आपल्या गावाची ओढ लागली होती, परंतु प्रवासाची सर्व वहाने विशेषत: सार्वजनिक रेल्वे व बस बंद झाल्याने काही कामगारांनी पायीच मोर्चा आपल्या गावाकडे वळवला, मात्र ही मोठी मजल कशी मारायची हा प्रश्न असताना शासनाने या मजुरांना गावी जाण्यासाठी परवानगी दिली. मजुरांना गावी जाण्यासाठी रेल्वे खाते व राज्य परिवहन मंडळ पुढे आले. यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज करण्याच्या सुचना दिल्यानंतर रोह्यात चार हजारांच्या आसपास अर्ज दाखल झाले असून, अजून काही मजूर आपल्या गावी जाण्यासाठी अर्ज करीत आहेत.
सर्व अर्जांची छाननी करुन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मागर्दशक सूचनांनुसार मंगळवारी दुपारी 12च्या सुमारास रोह्यातुन गुजरात राज्यातील 32, तर कर्नाटक राज्यातील 80 मजुरांना एसटी बसने रवाना करण्यात आले. कर्नाटक राज्यातील मजुरांसाठी चार आणि गुजरात राज्यासाठी तीन बस मजुरांना घेऊन रवाना झाल्या. या वेळी प्रत्येक मजुराच्या चेहर्यावर आपल्या गावी जाऊन आप्तेष्टांना भेटणार असल्याने आनंद दिसून आला.
प्रत्येक मजुराला मास्क, पाणी बॉटल, बिस्किट, खाण्याचे साहित्य आदी आवश्यक वस्तू व पदार्थ देण्यात आले. या वेळी रोहा उपविभागीय अधिकारी यशवंतराव माने, तहसीलदार कविता जाधव, उपसभापती रामचंद्र सकपाळ, वरसे तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर सुर्वे आदी उपस्थित होते.