![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2020/05/Khopoli1-1-1024x576.jpg)
खोपोली ः प्रतिनिधी
कोरोनाच्या संकटकाळात महत्त्वाची अशी आरोग्यसेवा बजावणार्या परिचारिकांचा सन्मान करण्याचा हेतूने जागतिक परिचारिका दिनी खोपोली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था पुढे आली. संस्थेकडून खोपोली नगर परिषदेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय तसेच डॉ. रणजित मोहिते यांच्या पार्वती हॉस्पिटलमध्ये कार्यरत परिचारिकांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीचे डॉ. रणजित मोहिते, नगरसेवक किशोर पानसरे, एचडीएफसी बँकेचे प्रबंधक रवी लांघे, बाबू पुजारी, मोहमद पठाण, अमोल कदम आणि गुरुनाथ साठेलकर यांनी हा सन्मान केला. या सन्मानाने सर्व जण भारावून गेले होते.
वीज कोसळून गुरांचे गोठे भस्मसात
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2020/05/DHAVALE-VIJ-GURE-VADA-1024x493.jpg)
पोलादपूर ः प्रतिनिधी
तालुक्यातील ढवळे बौद्धवाडीमध्ये सोमवारी (दि. 11) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास वीज पडून गुरांचे दोन गोठे जळून खाक झाले. याबाबत सुमारे साडेतीन लाखांच्या नुकसानीचा पंचनामा महसूल विभागाने केल्याची माहिती आहे. पोलादपूर तालुक्यातील ढवळे बौद्धवाडीतील दादू बगाडे आणि मधुकर बगाडे यांच्या प्रत्येकी एका गुराच्या गोठ्यावर सोमवारी सायंकाळी मुसळधार अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळली. यानंतर दोन्ही गोठ्यांनी पेट घेतला. या वेळी दोन्ही गोठ्यांतील प्रत्येकी दोन गायी आणि दोन वासरे, पेंढा तसेच गोठ्यांच्या इमारती जळून खाक झाल्याचे पंचनामे महसूल विभागाने केले आहेत.
आसलवाडीतील हातभट्टी उद्ध्वस्त
कर्जत ः बातमीदार
नेरळ आणि कर्जत पोलीस ठाण्याकडून गावठी दारूभट्ट्यांविरुद्ध जोरदार कारवाया सुरू झाल्या आहेत. त्यात नेरळ पोलिसांनी आसलवाडीमधील हातभट्टी उद्ध्वस्त करून 49,600 रुपयांचा माल तेथेच नष्ट केला. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्याकरिताच्या नियमांचे उल्लंघन केल्याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरळ पोलीस ठाणे हद्दीत आसलवाडी येथे गावठी दारू बनवत असल्याची खबर मिळाली होती. नेरळ पोलिसांनी खात्री करून मौजे आसलवाडी गावातील डोंगराच्या पायथ्याजवळ ओहोळामध्ये विनापरवाना बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या हातभट्टीवर धाड टाकली. तेथे पोलिसांना गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याकरिता गावठी हातभट्टी लावून तसेच त्याकरिता लागणारा गूळ व नवसागर पाणीमिश्रित रसायन आदी साहित्य आढळून आले. या वेळी 49,600 रुपयांचा गावठी हातभट्टी तयार करण्याकरिता लागणारा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गु. र. नं. 67/2020 भा. दं. वि. कलम 188, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949चे कलम 65 (फ), 83प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो. ना. भोईर करीत आहेत.
अल्पवयीन मुलीस पळविले
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2020/05/Girl.jpg)
पेण ः प्रतिनिधी
पेणमधील काजुर्लेवाडी येथून 13 वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत फिर्यादी रा. काजुर्लेवाडी ता. पेण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या अल्पवयीन मुलीस राहत्या घरातून तिच्या अज्ञानाचा फायदा घेत अज्ञात आरोपीने फूस लावून पळवून नेले आहे. या प्रकरणी त्यांनी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंपळे करीत आहेत.