
खारघर : प्रतिनिधी
खार जमीन संशोधन केंद्र पनवेल याठिकाणी मत्सबीज नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. अत्यावश्यक सेवेत मोडणार्या या केंद्रात मत्सशेती, तसेच भातशेती संदर्भात शेतकर्यांना मार्गदर्शन व संशोधन केले जाते.
क्षार जमिनीवर संशोधन करणारे हे महाराष्ट्रातील एकमेव संशोधन केंद्र आहे. या संशोधन केंद्राची स्थापना 1943 मध्ये कृषि संशोधन केंद्र म्हणून झाली नंतर आवश्यक असणारे शास्त्रज्ञ व इतर मनुष्यबळ पुरविण्यात आल्यानंतर 1959 मध्ये कृषि संशेाधन केंद्राचे नामकरण खार जमीन संशोधन केंद्र असे करण्यात आले. यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधा राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प या योजनेतून अंशत: योजना-1 आणि योजना-1 यामधून पुरविण्यात आल्या. या केंद्राचे कार्यक्षेत्र पनवेल आणि पारगांव या दोन प्रक्षेत्रामध्ये विभागण्यात आले आहे. या केंद्राची जागा नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित करण्यात आली आहे.
या केंद्राचे तंत्रशुद्ध भातशेती, मत्सशेतीचे धडे शेतकर्यांना दिले जातात. याठिकाणी मत्सशेती देखील केली जाते. विविध प्रकारचे मासे, जिताडे आदींसारखे माशांची विक्री देखील या केंद्रात केली जात आहे. लॉकडाऊनमुळे याठिकाणी आयोजित केलेली अनेक शिबिरे रद्द झाली असली तरी केंद्रामार्फत भातबियाणे तसेच मत्सबीयाने आम्ही शेतकर्यांसाठी विक्रीसाठी ठेवली असल्याचे केंद्राचे प्रमुख डॉ. सुरेश दोडके यांनी सांगितले. दरम्यान भातबियाणे, मत्सबीज विक्री करत असताना याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले जात असल्याचे डॉ. दोडके यांनी सांगितले. पनवेल परिसरात भात शेती मोठ्या प्रमाणात नष्ट झाली. मत्सशेती हा नवीन पर्याय म्हणून शेतकर्यांसाठी पुढे आला. अनेक शेतकर्यांनी तो निवडला या केंद्रामुळे अनेकांना मत्सशेतीच्या रूपाने रोजगाराची संधी मिळाली. विशेष म्हणजे मोठ्या संख्येने तरुण उद्योजक याकडे झुकत असून मत्सशेतीकडे पर्याय म्हणून बघत असल्याचे मत्सशास्त्रज्ञ डॉ. विवेक वर्तक यांनी सांगितले.